उमेद – वन्यजीव छायाचित्रणाचा ‘ऑस्कर’!
>> सारंगी मुंडे
वन्यजीव छायाचित्रण हा खरंतर पॅशनचा म्हणजेच आवडीचा विषय. निसर्गाच्या सान्निध्यात राहून टिपलेली ही छायाचित्रे निसर्गाविषयी अधिकच कुतूहल निर्माण करतात. या आनंदाबरोबरच अथ परिश्रम, संयम, चिकाटी या गुणांचीही परीक्षा घेतली जाते. या परीक्षेतील टिपेचा क्षण म्हणजे अनपेक्षित असा क्लिक टिपला जाणे. छायाचित्रकारासाठी हा त्याच्या आयुष्यातला अनमोल असाच क्षण असतो. या बंदिस्त क्षणाला जर कौतुकाची थाप मिळाली तर तो सुवर्णक्षणच. बदलापूरचे छायाचित्रकार सीताराम राऊळ यांना लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमतर्फे कौतुकाची थाप मिळाली आहे.
वन्यजीव छायाचित्रकार सीताराम दिनकर राऊळ यांनी लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युझियमतर्फे आयोजित प्रतिष्ठित ’वाइल्डलाइफ फोटोग्राफर ऑफ द इयर 2026’ स्पर्धेत ’बिहेविअर: इनव्हर्टिब्रेट्स’ गटात श्रेणी विजेता (Category Winner) होण्याचा बहुमान पटकावला आहे. हा पुरस्कार म्हणजे वन्यजीव छायाचित्रणातील ‘ऑस्कर’ मानला जातो. या स्पर्धेत 121 देशांमधून आलेल्या 65,403 हून अधिक छायाचित्रांमधून सीताराम यांच्या छायाचित्राची निवड झाली आहे.
त्यांच्या या छायाचित्रात जैसलमेरच्या वाळवंटात विंचू स्वतसाठी खड्डा खोदून निवारा तयार करत असल्याचा दुर्मीळ क्षण टिपण्यात आला असून, प्रतिकूल वातावरणातील जगण्याची धडपड त्यातून दिसते. गेल्या 14 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असलेल्या राऊळ यांच्या या यशाबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वन्यजीव छायाचित्रण म्हटलं की वाघ, बिबटय़ा हेच प्राणी डोळ्यासमोर येतात; पण सीताराम राऊळ यांनी निसर्गाच्या अधिवासात स्वतचे कौशल्य पणाला लावणाऱया विंचवाची छबी टिपत जैवविविधतेतील वेगळेपण दर्शवले आहे.
सीताराम राऊळ हे गेली 14 वर्षे छायाचित्रणाच्या क्षेत्रात कार्यरत असून व्यावसायिक फोटोग्राफीसोबतच वन्यजीव छायाचित्रकार ही ओळखही त्यांनी मिळवली आहे. यातही मॅक्रो आणि क्रिएटिव्ह नेचर फोटोग्राफीची त्यांना विशेष आवड आहे. निसर्गाकडे पाहताना त्यातले सौंदर्य अचूक टिपण्याचे कौशल्य आत्मसात करावे लागते. सीताराम राऊळ हे चित्रकार असल्याने ती सौंदर्यदृष्टी त्यांच्याकडे आहे.
निसर्गाकडे बघण्याची दृष्टी बदलण्यासाठी कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे मत ते व्यक्त करतात. त्यांनी टिपलेल्या पुरस्कारप्राप्त छायाचित्रातही निसर्ग आणि बदल हा महत्त्वाचा आशय त्यांनी मांडला आहे. निसर्ग हा केवळ गुरू नसून, आपलं अस्तित्व राखणारा अंश आहे. निसर्गसंवर्धनाचा संदेश छायाचित्रणाच्या माध्यमातून कायम देण्याचा प्रयत्न करेन, असं मतही ते व्यक्त करतात.
Comments are closed.