हेरगिरी प्रकरणात हरियाणात सहा अटक

एका ट्रॅव्हल ब्लॉगरसह सहा जणांना पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपात हरियाणात अटक करण्यात आली आहे. या सहा जणांनी सिंदूर अभियानाच्या काळात भारताच्या सैन्याच्या हालचालींची माहिती पुरविल्याचा आरोप आहे. या सहा जणांमध्ये एका महिलेचा समावेश आहे, जी हा ट्रॅव्हल ब्लॉग चालवीत होती. ज्योती मल्होत्रा असे तिचे नाव आहे. तिचे एका पाकिस्तानी नागरीकाशी जवळचे संबंध असल्याची कबुली तिने आपल्या जबाबत दिली आहे.

ज्योती मल्होत्रा ही महिला ‘ट्रॅव्हल विथ जो’ हा ब्लॉग चालवित होती. 2023 मध्ये तिने पाकिस्तानला भेट दिली होती. त्यावेळी तिचे संबंध पाकिस्तानच्या भारतील उच्चायोगाच्या एका कर्मचाऱ्याशी निर्माण झाले. दानिश असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याने पाकिस्तानातील अनेक एजंटस् शी तिचा परिचय करुन दिला. हे सर्व पाकिस्तानसाठी हेरगिरी करीत होते. दानिश याने तिचा परिचय पाकिस्तानच्या अनेक गुप्तहेरांशीही करुन दिला होता. ती या सर्वांशी व्हॉटस्अॅप, टेलिग्राम आणि स्पॅपचॅट आदी माध्यमांमधून संपर्कात होती. या काळात तिचा परिचय शकीर ऊर्फ राणा शहबाझ याच्याशी झाला आणि त्यांच्यात जवळीक वाढली, असे प्राथमिक पोलीस तपासात आढळल्याची माहिती देण्यात आली आहे.

ऑपरेशन सिंदूर संबंध

ही महिला आणि तिचे पाच सहकारी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यात 7 मे ते 10 मे या काळात संघर्ष होत असताना भारताच्या सैन्याच्या हालचालींची माहिती पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला दिली, असे तिच्या मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक साधनांच्या तपासणीतून आढळले आहे. तिच्यासह गुझाला नामक हरियाणातील महिलेलाही अटक करण्यात आली आहे. तिने दिल्लीतील पाकिस्तान दूतावासाला व्हिसा मिळविण्यासाठी भेट दिली होती. तिला दानिश आणि इतरांकडून पैसे दिले जात होते. 1 हजार ते 10 हजार रुपये अशी रक्कम तिला विविध वेळी दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी यमीन मोहम्मद, देविंदरसिंग धिल्लन आणि आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. ज्योती मल्होत्रा आणि इतरांची ही बेकायदेशीर हेरगिरी हे हिमनगाचे केवळ एक टोक असून तो मोठ्या आणि व्यापक हेरगिरी कारस्थानाचा एक भाग आहे, असा पोलिसांचा संशय आहे.

तरुणींना जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न

पाकिस्तानसाठी हेरगिरी पाकिस्तान्यांच्या टोळ्या भारतात असून त्या भारतातील तरुणींना आपल्या जाळ्यात ओढत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा तरुणींच्या अडचणींचा लाभ उठवून त्यांना पैशाचे, महागड्या वस्तूंचे आणि लग्नाचे आमिष दाखविले जाते. त्या जाळ्यात अडकल्यानंतर त्यांची नको त्या अवस्थेतील व्हिडीओग्राफी केली जाते आणि त्यांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून बेकायदेशीर कामे अशा टोळ्यांकडून करुन घेतली जातात. ज्योती मल्होत्राने दिलेल्या लेखी जबाबतून अनेक बाबी समोर आल्या असून अशा टोळ्यांचा पर्दाफाश केला जाईल,  असे आश्वासन पोलिसांकडून दिले गेले आहे. मात्र, तरुण-तरुणींनी सावध रहावे आणि त्यांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. देशविरोधी शक्तींच्या जाळ्यात अडकून स्वत:च्या आयुष्याची हानी करुन घेऊ नये, असे स्पष्ट केले गेले आहे.

Comments are closed.