मथुरामध्ये उत्खनन दरम्यान सहा घरे कोसळली

वृत्तसंस्था/ मथुरा

उत्तर प्रदेशातील मथुरा जिह्यात रविवार, 15 जून रोजी एक भयानक दुर्घटना उघडकीस आली. जेसीबीद्वारे माती खोदाईचे काम सुरू असताना आजूबाजूची अनेक घरे अचानक कोसळली. ही घटना मसानी पोलीस स्टेशन परिसरातील गोविंदनगर भागात घडली. या अपघातात किमान 10-11 जण ढिगाऱ्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्यादरम्यान तीन मृतदेह सापडले असून अन्य लोकांचा शोध घेण्यासाठी मदतकार्य सुरूच ठेवण्यात आले होते. मदतकार्याच्या पहिल्या टप्प्यात चार जणांना ढिगाऱ्यातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे, परंतु अजूनही काहीजण अडकले आहेत.

स्थानिक प्रशासन, पोलीस, अग्निशमन विभाग आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. जेसीबी मशीनच्या मदतीने ढिगाऱ्यातून लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले जात होते. प्राथमिक माहितीनुसार, दुपारी माती उत्खनन करताना अचानक ढिगारा कोसळल्याने हा अपघात झाला. या ढिगाऱ्यावर बांधलेल्या घरांचा पाया कमकुवत झाल्यामुळे एकामागून एक अनेक घरे भूस्खलनाच्या विळख्यात सापडली. हा अपघात इतका भीषण होता की काही क्षणातच संपूर्ण परिसर मातीने झाकला गेला आणि आरडाओरडा सुरू झाला, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी माती उत्खनन करताना योग्य खबरदारी न घेतल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे दिसून येत आहे. प्रशासन याची चौकशी करत आहे.

Comments are closed.