Building collapses in Delhi दिल्लीत इमारत कोसळून सहा जणांचा मृत्यू, १० जण जखमी, दोन अभियंत्यांचे निलंबन
राजधानी दिल्लीत साकेत मेट्रोस्टेशनजवळ येथे इमारत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. दक्षिण दिल्लीतील सैदुलाजाब येथील साकेत मेट्रो स्टेशनजवळ चार मजली व्यावसायिक इमारत कोसळल्यानंतर , दिल्ली महानगरपालिकेने रविवारी दोन अभियंत्यांना निलंबित केले .
“३०.०५.२०२६ रोजी नवी दिल्ली येथील सैद-उल-अजैब, वेस्टर्न मार्ग, गल्ली क्र. ५, खसरा क्र. २६२, मालमत्ता कोसळण्याच्या प्रकरणात प्रभावी पर्यवेक्षणाचा अभाव आणि हलगर्जीपणाच्या कारणास्तव अमन जैन आणि औदेश सिंग चौहान यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे,” असे ग्रीन पार्क, दक्षिण विभागाच्या उपआयुक्तांनी रविवारी (३१ मे) जारी केलेल्या आणि स्वाक्षरी केलेल्या एका सूचनेत म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार अमन हा बांधकाम विभाग-२-दक्षिण विभागामध्ये कनिष्ठ अभियंता होता, तर चौहान सहायक अभियंता होता.
मृतांची संख्या सहावर.
हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार इमारत कोसळून किमान सहा जणांचा मृत्यू झाला असून, १० जण जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर, ढिगाऱ्याखालून वाचलेल्यांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले. रविवार संध्याकाळपर्यंत, आणखी लोकांना वाचवण्याच्या आशेने शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.
ढिगाऱ्याखालून बाहेर काढलेल्यांना उपचारासाठी तातडीने एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. शनिवारी सायंकाळी ७:४४ वाजता डीएफएसला इमारत कोसळल्याबाबत फोन आला. एचटीने यापूर्वी दिलेल्या वृत्तानुसार, ही इमारत सैदुलाजाबमधील वेस्टर्न मार्गावरील दाट लोकवस्तीच्या परिसरात होती , जो विविध पेइंग गेस्ट निवास, कोचिंग सेंटर्स आणि स्टुडंट मेससाठी ओळखला जातो.
बचाव मोहिम सुरुच
ही बचाव मोहीम अनेक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), दिल्ली अग्निशमन दल (डीएफएस), दिल्ली पोलीस, दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (डीडीएमए), दिल्ली महानगरपालिका (एमसीडी), नागरी संरक्षण दल आणि कॅट्स रुग्णवाहिका सेवा यांच्या पथकांमार्फत ती पार पाडली जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रत्येक बेपत्ता व्यक्तीचा शोध लागेपर्यंत बचावकार्य सुरू राहण्याची शक्यता आहे. इमारत कोसळण्याचे कारण अद्याप निश्चित झाले नाही.
Comments are closed.