आंध्रात खाण अपघातात सहा कामगार मरतात

सर्कल संस्था/हैदराबाद

आंध्र प्रदेशातील बापटला जिह्यातील एका खासगी ग्रॅनाइट खाणीत रविवारी झालेल्या दुर्घटनेत किमान 6 कामगारांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. बल्लीकुर्वा परिसरात खाणीचा कडा अचानक कोसळल्यामुळे कामगारांवर मोठे दगड कोसळले. याप्रसंगी खाणीत 15-20 कामगार काम करत होते. त्यापैकी बहुतेक ओडिशातील स्थलांतरित कामगार होते. घटनेच्या वेळी ब्लास्टिंग सुरू असल्यामुळे खडकांचा मोठा भाग कोसळून अनेक कामगार ढिगाऱ्याखाली दबल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. आठ गंभीर जखमींना नरसारोपेटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी अपघाताबद्दल तीव्र शोक व्यक्त करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमींवर उपचार करताना कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा दाखवू नये असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

Comments are closed.