‘एपस्टीन फाईल्स’मधून ‘ट्रम्प फाईल्स’ गायब; अमेरिकेच्या न्याय विभागाने 16 दस्तावेज वेबसाईटवरून हटवले

अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करणारा जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित तीन लाखांपेक्षा जास्त छायाचित्रे आणि इतर कागदपत्रे असलेल्या फाईल्स शुक्रवारी अमेरिकेच्या न्याय विभागाने प्रसिद्ध केल्या. मात्र काही तासांमध्येच त्यातील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित छायाचित्रे असलेल्या 16 फाईल्स वेबसाईटवरून हटविण्यात आल्या आहेत. त्यामागील कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.

एपस्टीन सेक्स स्पॅण्डल प्रकरणाशी संबंधित दस्तावेज 19 डिसेंबरला प्रसिद्ध करण्याचे अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटले होते. त्यामुळे त्याकडे जगभराने नजरा रोखून धरल्या होत्या. ही माहिती अपलोड होताच न्याय विभागाच्या संबंधित वेबसाईटवर जगभरातून लोक अक्षरशः तुटून पडले. या फाईल्समध्ये डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप सिंगर मायकल जॅक्सन, हॉलीवूड अभिनेता ख्रिस टकर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींची छायाचित्रे आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे या संपूर्ण दस्तावेजात डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव क्वचितच आले आहे आणि ट्रम्प हे एपस्टीन याचे एकेकाळी जवळचे मित्र होते. न्याय विभागाने शनिवारी 16 फाईल्स डिलीट केल्या. त्यात ट्रम्प यांची छायाचित्रे होती. ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प, जेफ्री एपस्टीन आणि त्याची प्रेयसी गिजलेन मॅक्सवेल हे काही छायाचित्रात एकत्र दिसत आहेत. ही छायाचित्रे डिलीट करण्यात आली आहेत.

आयुर्वेदिक मसाज उल्लेख

एपस्टीन फाईल्समध्ये आयुर्वेदिक मसाजचा उल्लेख आढळला आहे. शरीराचे शुद्धीकरण करण्यासाठी तिळाच्या तेलाचा वापर करण्याचा उल्लेख ‘द आर्ट ऑफ गिव्हिंग मसाज’ या लेखाचा उल्लेख आहे. याशिवाय मुलींना मसाज कसा द्यावा, याच्या काही टीप्स आढळतात. त्यात अश्लील प्रक्रियादेखील मुलींना सांगण्यात येत होती.

एपस्टीनच्या खासगी जेट विमानातून फिरायचे ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प आणि एपस्टीन हे एकेकाळी घनिष्ठ मित्र होते. एपस्टीन याच्या खासगी विमानातून त्यांनी अनेकदा प्रवास केला आहे. 1993 ते 1997 या कालावधीत ट्रम्प यांनी एपस्टीन याच्या खासगी जेट विमानातून प्रवास केल्याचा दावा अमेरिकेतील माध्यमांनी केला आहे.

विरोधक आक्रमक

डोनाल्ड ट्रम्प यांची छायाचित्रे हटविल्यावरून विरोधक डेमोव्रॅट पक्षाच्या सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. अजून काय काय लपविण्यात येत आहे, असा सवाल या सदस्यांनी केला असून संपूर्ण पारदर्शकता हवी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, ‘नियर इंटेलिजन्स’ने केलेल्या विश्लेषणानुसार एपस्टीनच्या बेटावर जाणारे सर्वाधिक  अमेरिका, युव्रेन आणि ऑस्ट्रेलियातील असल्याचे आढळले आहेत.

Comments are closed.