SLvsIND: शुभमन गिलला सचिन-विराटच्या खास क्लबमध्ये सामील होण्याची संधी, आतापर्यंत केवळ दोन भारतीय कर्णधारांनाच जमलं ‘हे’

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका शनिवारपासून (15 ऑगस्ट) सुरू होत आहे. पहिला सामना गॉल येथे खेळला जाणार असून, दुसरा सामना कोलंबोमध्ये खेळला जाणार आहे. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) 2025-2027 चा भाग आहे. या स्पर्धेच्या गुणतालिकेत भारत पाचव्या आणि श्रीलंका सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा मालिका जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर भारतीय कर्णधार शुभमन गिलला एका खास यादीत समाविष्ट होण्याची संधी आहे.
सध्या भारतीय संघात असलेल्या केएल राहुल, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनाच श्रीलंकेत कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. त्यामुळे गिलप्रमाणे बाकी सर्व पहिल्यांदाच श्रीलंकेत खेळणार आहे. अशा परिस्थितीत गिलकडे सचिन-विराटच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.
केवळ दोन भारतीय कर्णधारांनाच श्रीलंकेत जमला ‘हा’ विक्रम
भारताने श्रीलंकेत पहिल्यांदा कसोटी मालिका 1985 मध्ये खेळली. तेव्हापासून सात भारतीय कर्णधारांनी तेथे संघाचे नेतृत्व केले. त्यामधील केवळ दोघांनाच शतके झळकावता आली. ही जबरदस्त कामगिरी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनीच केली आहे.
भारत 1997 मध्ये सचिनच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेत कसोटी मालिका खेळला. त्यावेळी सचिनने पहिल्या कसोटी सामन्यात 143 धावा केल्या होत्या. तो सामना अनिर्णीत राहिला होता. दुसऱ्या सामन्यातही त्याने शतक केले. त्याने 16 षटकारांच्या सहाय्याने 266 चेंडूंमध्ये 139 धावा केल्या. तो सामनाही अनिर्णीत राहिला होता.
विराटनेही 2015 आणि 2017 मध्ये शतक ठोकले
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने 2015 मध्ये गॉल येथे 103 धावांची खेळी केली होती, मात्र तो सामना श्रीलंकेने जिंकला होता. त्याने 2017 मध्ये गॉल येथे खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात 103* धावा केल्या. तो सामना भारताने तब्बल 304 धावांनी जिंकला होता. आता त्याने कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याने, तो भारतासाठी केवळ वनडे प्रकारचे सामने खेळतो.
सचिन-विराटनंतर आता श्रीलंकेत कसोटी शतक करणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत गिलला सामील होण्याची संधी आहे. सराव सामन्यात त्याने उत्तम फलंदाजी केली होती. त्याचबरोबर मागील काही सामन्यांमध्ये त्याने लक्षवेधी कामगिरी केली आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने 88.75 च्या सरासरीने 1065 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो सचिन आणि विराट यांच्यासारखा पराक्रम करण्याची दाट शक्यता आहे, मात्र एकच अडचण असणार आहे.
गिल पहिल्यांदाच श्रीलंकेत कसोटी खेळणार आहे आणि तो फिरकीविरुद्ध चांगली फलंदाजी करत असला, तरी त्याला तेथिल परिस्थितीशी जूळवून घ्यावे लागेल. तसेच त्याला सरावावेळी दुखापत झाली होती, मात्र ती आता सुधारली असून त्याने 44 धावा करत आपण कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले.
Comments are closed.