गॅस टंचाईवर संसदेबाहेर घोषणाबाजी
विरोधी पक्षाच्या खासदारांनी सभागृहातही उठवला आवाज : सभापती ओम बिर्ला यांनी राहुल गांधी यांना दिली ताकीद
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
देशात एलपीजी सिलिंडरच्या कथित कमतरतेवरून विरोधकांनी गुरुवारी संसदेत सरकारला घेरले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मुद्यावर चर्चेची सूचना दिली, तर विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेच्या आवारात सिलिंडर संकटावरून निदर्शने करत सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी ‘नरेंद्र गायब, सिलिंडरही गायब’ अशा आशयाच्या घोषणा देत गॅस सिलिंडर टंचाईच्या समस्येवर आवाज उठवला.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी सभागृहात एलपीजी संकटाचा मुद्दा उपस्थित केला. एलपीजी टंचाईवर चर्चेसाठी राहुल गांधी यांनी लोकसभेत सूचना दिली. देशाच्या अनेक भागात सिलिंडर पुरवठ्यावर परिणाम होत आहे आणि सरकारने स्पष्ट उत्तर द्यावे असे विरोधी पक्षाचे म्हणणे होते. संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी हा महत्त्वाचा मुद्दा असून सरकार उत्तर देण्यास तयार असल्याचे सभागृहाला सांगितले. सरकार उत्तर देऊ इच्छित नाही असे नाही. संबंधित मंत्री सभागृहात परत येताच सरकार या मुद्यावर उत्तर देईल, असे रिजिजू म्हणाले.
राहुल गांधी यांनी गॅस टंचाईच्या मुद्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘गॅस टंचाईची समस्या आताच सुरू झाली आहे. रेस्टॉरंट्स बंद होत आहेत, एलपीजी उपलब्धतेबद्दल भीती असून अनेक विक्रेते प्रभावित होत आहेत, अशी सद्यस्थिती राहुल गांधी यांनी सभागृहात मांडली. कोणत्याही देशाचा पाया त्याची ऊर्जा सुरक्षा आहे. रशियाकडून गॅस किंवा तेल खरेदी करावे की न करावे हा निर्णय अमेरिका घेत असेल तर ते समजण्यापलीकडे आहे.
मी हे कोडे काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असे राहुल गांधी म्हणाले. तसेच त्यांनी पेट्रोलियममंत्र्यांचे नाव एपस्टीन फाईल्सशी जोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर सभागृहात गोंधळ उडाला. सभापती बिर्ला यांनी राहुल गांधींना रोखत ‘तुम्ही ज्या विषयावर नोटीस दिली आहे त्यावर बोला. जर तुम्हाला यावर बोलायचे असेल तर नोटीस द्या.’ अशा कडक शब्दात राहुल गांधी यांना समज दिली. यावर विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ सुरू केला.
संसद नियमांनुसार चालेल : ओम बिर्ला
सभापती ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाला कानपिचक्या देताना कडक शब्दात समज दिली. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ज्या विषयावर नोटीस दिली होती त्या विषयावर बोलण्याची संधी दिली. तथापि, विरोधी पक्षाच्या जबाबदार नेत्याच्या उपस्थितीतही सूचना न देता इतर कोणत्याही विषयावर चर्चा करणे संसदेच्या नियमांविरुद्ध आहे. ही पद्धत योग्य नाही. संसद अशाप्रकारे चालणार नाही. संसद नियमांनुसार चालेल. कोणालाही कोणतेही विशेष अधिकार नाहीत.’ असे त्यांनी सुनावले. या वक्तव्यानंतर बिर्ला यांच्या आसनावर जगदंबिका पाल विराजमान झाले. यादरम्यान विरोधी पक्षाचे खासदार वेलमध्ये उतरले होते. जगदंबिका पाल यांनी खासदारांना आसनावर जाऊन बसण्याची विनंती केल्यानंतर काही वेळाने पेट्रोलियम मंत्र्यांनी गॅस आणि इंधन उपलब्धतेबाबत संपूर्ण माहिती सभागृहाला दिली.
लोकांमध्ये भीती कायम
इराण-अमेरिका-इस्रायल युद्ध सुरू असताना भारतात एलपीजीच्या कमतरतेच्या अफवा आणि टंचाईमुळे जनतेची चिंता वाढली आहे. वेगवेगळ्या शहरांमध्ये सिलिंडरची उपलब्धता वेगवेगळी असल्याचे वृत्त येत आहे. अनेक शहरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या कमतरतेचा परिणाम दिसून येत आहे. घरगुती सिलिंडर्सचा पुरवठा सुरू असला तरी टंचाईच्या शक्यतेमुळे लोकांमध्ये भीती कायम आहे. एलपीजी सिलिंडर उपलब्ध नसल्याने, अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सनी पुन्हा एकदा जुन्या पद्धतींचा अवलंब केला आहे. मटण आणि चिकन आता लाकूड आणि कोळशाच्या चुलीवर शिजवले जात आहे.
Comments are closed.