अर्थभान – सुरक्षित गुंतवणूक, योग्य लाभ

>> लिली करंडे

पैशांचं नियोजन हे तितकं सोपं नाही आणि कठीणही नाही. म्हणूनच आर्थिक नियोजन किंवा गुंतवणुकीसाठी जागरूक राहायला हवे.

आपल्या पैशांची आर्थिक गुंतवणूक म्हटली की, आपण साचेबद्ध तर्क लावून, आपलं ठोस मत बनवून त्याप्रमाणे एक सुरक्षित, पठडीबाज गुंतवणूक करून टाकतो, पण पैशांचं नियोजन हे तितकं सोपं नाही आणि कठीणही नाही. म्हणूनच आर्थिक नियोजन किंवा गुंतवणुकीसाठी जागरूक राहायला हवे. म्हणूनच गुंतवणुकीसंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी सोप्या पद्धतीने, उदाहरणासकट समजून घेऊया.

गुंतवणुकीतील महत्त्वाची गोष्ट म्हणजे चक्रवाढ व्याज. याबाबत समजून घेऊ या. चक्रवाढ (Compound) ) म्हणजे फक्त तुमच्या मूळ गुंतवणुकीवर (Principal) व्याज मिळणे नाही, तर त्या व्याजावरही पुन्हा व्याज मिळणे. कोणत्याही संकल्पनेला समजून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे उदाहरणासह स्पष्टीकरण देणे. म्हणूनच आज मी तुम्हाला दोन मित्रांची  गोष्ट सांगणार… श्लोक-आणि आलोक. दोघांनीही वयाच्या 25 व्या वर्षी कमवायला सुरुवात केली. श्लोकचे निव्वळ उत्पन्न  महिना 40,000 रुपये होते, तर आलोकचे निव्वळ उत्पन्न महिना 80,000 रुपये होते.

श्लोककडे  घरभाडे, घरखर्च आणि प्रवासाचा खर्च वजा करून  महिन्याला फक्त पाच हजार रुपये शिल्लक राहायचे. त्याने ही शिल्लक रक्कम न चुकता दरमहा गुंतवण्याचा निर्णय घेतला. उत्पन्न वाढेल तशी गुंतवणुकीची रक्कम दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढवायची असेही ठरवले. वयाच्या 35व्या वर्षी त्याने कर्ज घेऊन घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर इएमआय व गुंतवणूक यांचेही योग्य नियोजन केले. याउलट, आलोकला नेहमीच आलिशान जीवनशैली हवी होती. त्याने लगेच कर्जावर स्वतसाठी एक घर घेतले, कर्जावर कार घेतली, क्रेडिट कार्ड काढले आणि राजासारखे जीवन जगू लागला. या सगळ्यात महिन्याच्या शेवटी सर्व इएमआय आणि इतर खर्च भागवल्यानंतर त्याच्याकडे बचतीसाठी  शून्य रक्कम उरायची. 20 वर्षांनंतर (वय वर्षे 45) सर्व कर्जाचे हप्ते आणि इतर पेमेंट पूर्ण झाल्यावर आलोकने आपल्या भविष्यासाठी दरमहा 50 हजार रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला. समजा दोघेही वयाच्या 60 व्या वर्षी निवृत्त होणार असतील तर तुमच्या मते कोणाची बचत जास्त असेल आणि कोणाला आपल्या गुंतवणुकीचे उत्तम मूल्य मिळेल?

आर्थिक विश्लेषण : आलोक जरी नंतरच्या आयुष्यात श्लोकपेक्षा दहा पटीने जास्त मासिक गुंतवणूक करत असला तरीही श्लोकच या स्पर्धेत जिंकेल. दीर्घकालीन इक्विटी गुंतवणुकीचा सरासरी परतावा वार्षिक 12 टक्के पकडून याबाबतचे गणित मांडता येते.

श्लोक आणि आलोकच्या गुंतवणुकीच्या या उदाहरणातून असा निष्कर्ष निघतो की,  श्लोकने गुंतवणुकीची सुरुवात 20 वर्षे आधी केली. त्यामुळे त्याने खिशातून दरमहा कमी रक्कम गुंतवूनही चक्रवाढीच्या शक्तीमुळे वयाच्या 60 व्या वर्षी 8.88 कोटींचा निधी उभारला. दुसरीकडे, आलोकने 90 लाख गुंतवूनही त्याचा अंतिम निधी 2.52 कोटींवरच पोहोचला. म्हणजेच श्लोककडे आलोकपेक्षा सुमारे 6.36 कोटी जास्त असतील.

ही कथा वैयक्तिक फायनान्सच्या तीन अत्यंत महत्त्वाच्या नियमांवर प्रकाश टाकते :

  1. वेळेची ताकद (Power of Time): चक्रवाढ व्याजाच्या (Compounding)- गणितात पैशांच्या प्रमाणापेक्षा; पैशाला दिलेला वेळ जास्त महत्त्वाचा असतो.
  2. जीवनशैलीतील महागाईचा सापळा (Lifestyle Inflation Trap):: आलोकचे उत्पन्न दुप्पट (80 हजार) असूनही तो सुरुवातीला शून्य बचत करत होता. याला आर्थिक भाषेत लायबिलिटी ट्रॅप ((Liability ऊईज)म्हणतात, जिथे उत्पन्न वाढले की, लोक मालमत्ता (Assets)खरेदी करण्याऐवजी कर्जे (Liabilities)वाढवतात.
  3. शिस्त विरुद्ध आक्रमकता (Consistency vs. Aggression): श्लोकने कमी पगारातही दाखवलेली गुंतवणुकीची शिस्त; ही आलोकच्या नंतरच्या आक्रमक गुंतवणुकीपेक्षा भारी पडली. वेळ हा चक्रवाढीचा सर्वात मोठा मित्र आहे.

थोडक्यात, इन्व्हेस्टमेंट सुरू करण्यासाठी मोठय़ा रकमेची नाही, तर लवकर सुरुवात करण्याची गरज असते. लवकर सुरुवात आणि सातत्य असेल तरच आपल्याला चक्रवाढीचा जास्तीत जास्त फायदा मिळू शकतो. काय तर मग, लवकरच इन्व्हेस्टमेंट सुरू करताय ना?

[email protected]

(लेखिका गुंतवणूक सल्लागार आहेत.)

Comments are closed.