स्मृतीच्या विक्रमवीर शतकाने हाँगकाँग गारद; भारताचा सेमीफायनलमध्ये प्रवेश!

भारतीय महिला क्रिकेट संघाने हाँगकाँगचा 137 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करून महिला आशिया कप 2026 मध्ये सलग दुसरा विजय मिळवला. या दणदणीत विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत (सेमी-फायनलमध्ये) आपले स्थान निश्चित केले असून, ही कामगिरी करणारा तो स्पर्धेतील पहिला संघ ठरला आहे.

गुरुवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या ‘गट अ’ (Group A) मधील सामन्यात, स्मृती मानधनाचे विक्रमी शतक आणि गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी यांच्या जोरावर भारताने एकतर्फी विजय मिळवला. महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धावांच्या फरकाने भारताचा हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे. यापूर्वी भारताने 2018 मध्ये मलेशियाचा 142 धावांनी पराभव केला होता.

प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 5 बाद 193 धावांची भक्कम धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात, भारतीय गोलंदाजांसमोर हाँगकाँगचा डाव पूर्णपणे कोलमडला आणि संपूर्ण संघ 12 षटकांत केवळ 56 धावांत सर्वबाद झाला. भारतासाठी दीप्ती शर्मा सर्वात प्रभावी गोलंदाज ठरली तिने तीन बळी घेतले. तर श्री चरणी, नंदिनी शर्मा आणि प्रतिका रावल यांनी प्रत्येकी दोन बळी घेत हाँगकाँगचा डाव लवकर गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताचे सर्वात मोठे विजय

142 धावा विरुद्ध मलेशिया, क्वालालंपूर (2018)
137 धावा विरुद्ध हाँगकाँग, दुबई (2026)
104 ODI वि UAE, सिलहट (2022)
100 धावा विरुद्ध बार्बाडोस, बर्मिंगहॅम (2022)

स्मृती मानधना या सामन्याची स्टार ठरली. स्मृतीने 64 चेंडूंत 124 धावांची आक्रमक खेळी केली. तिच्या या खेळीत 14 चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता. स्मृतीने शेफाली वर्मासोबत पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी करून भारताला भक्कम सुरुवात करून दिली. शेफालीने 17 चेंडूंत 28 धावांचे योगदान दिले.

स्मृतीच्या या खेळीदरम्यान अनेक विक्रम प्रस्थापित झाले. आपल्या कारकिर्दीतील 18वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावून, तिने ऑस्ट्रेलियाची दिग्गज खेळाडू मेग लॅनिंगला मागे टाकले. शिवाय, महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारी फलंदाज बनली. स्मृतीच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हे दुसरे शतक होते.

याच खेळीदरम्यान, स्मृतीने मिताली राजचा 10868 आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रमही मोडला आणि महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली.

आशिया कप 2026 मध्ये सलग दोन विजय मिळवल्यानंतर, भारतीय महिला संघ 5 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास सज्ज आहे. अत्यंत उत्सुकता असलेल्या या सामन्याचे आयोजन दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर करण्यात आले आहे.

Comments are closed.