स्मृती मानधनाने रचला इतिहास, या विक्रमात विराट कोहलीलाही मागे टाकलं
भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलिया महिलांविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार फलंदाजी केली. मानधनाने 50 चेंडूत शतक पूर्ण केले आणि एकदिवसीय सामन्यात (पुरुष आणि महिला) सर्वात जलद शतक करणारी भारतीय फलंदाज बनली. तिने या बाबतीत विराट कोहलीचा विक्रम मोडला. विराटने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 52 चेंडूत शतक ठोकले होते.
413 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मानधनाने भारतीय महिला संघाला चांगली सुरुवात दिली. तिने सुरुवातीपासूनच आक्रमक दृष्टिकोन स्वीकारला आणि पॉवरप्लेमध्ये भरपूर चौकार आणि षटकार मारले. मानधनाने 23 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, रिचा घोषचा विक्रम मोडत भारतीय महिला एकदिवसीय सामन्यातील सर्वात जलद अर्धशतक ठरली.
स्मृती मानधनाने या सामन्यात 50 चेंडूत शतक पूर्ण केले, महिला एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारी दुसरी सर्वात जलद फलंदाज बनली. महिलांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद शतकाचा विक्रम माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार मेग लॅनिंगच्या नावावर आहे. 2012 मध्ये, मेग लॅनिंगने नॉर्थ सिडनी ओव्हल येथे न्यूझीलंड महिला संघाविरुद्ध फक्त 45 चेंडूत शतक ठोकले. आता मानधना या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. बेथ मूनी आणि करेन रोल्टन संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत, दोघांनीही 57 चेंडूत शतके ठोकली आहेत.
या निर्णायक एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोठ्या धावांचा पाठलाग करताना मानधनाने 63 चेंडूत 17 चौकार आणि 5 षटकारांसह 125 धावा केल्या. सध्या दिप्ती शर्मा आणि रिचा घोष क्रीझवर आहेत. तर भारत 23 षटकांनंतर 231-4 अश्या स्थितीत आहे.
Comments are closed.