क्रीडानगरीतून – ‘आता ती स्वप्न थांबवणार नाही’, स्मृती मानधनाचा मुलींना क्रीडा मंत्र

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पीसेफ डॉट कॉमच्या ‘प्ले इन कम्फर्ट’ मोहिमेत स्मृती मानधनाने मैनादेवी बजाज इंटरनॅशनल स्पूलमधील मुलींना प्रेरणा देत अनोखा क्रीडा मंत्र दिला. मासिक पाळीचा खेळात अडथळा नाही, संकोच सोडा आणि आत्मविश्वासाने मैदान गाजवा, असा संदेश देत स्मृतीने विद्यार्थिनींसोबत क्रिकेटचा आनंद घेतला. देशासाठी खेळताना मी वेदना विसरते, असेही मानधना म्हणाली. मोहिमेचा हेतू मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर करून स्वच्छता व सुरक्षित क्रीडा वातावरण देणे हा होता.

चर्चगेटठाणे यांच्यात अंतिम लढत

ठाणे केंद्र आणि चर्चगेट केंद्राने उपांत्य सामन्यात पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर 34 व्या एलआयसी कल्पेश गोविंद कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता ठाणे विरुद्ध चर्चगेट केंद्र असा दोन दिवसांचा अंतिम सामना येत्या शुक्रवार आणि शनिवारी (22 आणि 23 मे) वीर मेजर रमेश दडकर मैदानात रंगेल. माटुंगा जिमखाना येथे झालेल्या उपांत्य सामन्यात ठाणे सेंटरने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर एमसीए अकादमी केंद्रावर मात करत अंतिम फेरी गाठली. दुसऱया उपांत्य सामन्यात डावखुरा फिरकीपटू जय म्हात्रे याने सलग दुसऱया दिवशी हॅटट्रिक साजरी करत पाच विकेट्स मिळवत विरार केंद्राला दुसऱया डावात 8 बाद 185 धावांवर रोखले. पहिल्या डावातही जय म्हात्रेने हॅटट्रिकसह 6 विकेट टिपत विरार केंद्राचा 101 धावांत खुर्दा उडवला होता. चर्चगेट केंद्राकडून कर्णधार आरुष कोल्हे (58), शार्दुल फगारे (49) आणि श्लोक बोंगू (44) यांच्या खेळीमुळे पहिल्या डावात सर्वबाद 231 धावा करत 130 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली आणि अंतिम फेरी गाठली.

Comments are closed.