स्मृती मानधना-प्रतीका रावलची कमाल! महिलांच्या क्रिकेटमध्ये रचला पहिला ऐतिहासिक विक्रम
INDW vs AUSW: स्मृती मानधनाच्या शतकाच्या जोरावर, भारतीय महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 102 धावांनी पराभव केला. एकदिवसीय क्रिकेट इतिहासात धावांच्या बाबतीत हा ऑस्ट्रेलियन महिला संघाचा सर्वात मोठा पराभव आहे.
या सामन्यात स्मृती मानधना आणि तिची जोडीदार प्रतिका रावल यांनी इतिहास रचला आणि एक मोठा विश्वविक्रम प्रस्थापित केला. मानधना आणि रावल महिला एकदिवसीय क्रिकेट इतिहासात एका कॅलेंडर वर्षात 1000 पेक्षा जास्त धावा करणारी पहिली जोडी बनली. यापूर्वी, महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्क आणि लिसा कीटली यांच्या नावावर होता, ही भागीदारी त्यांनी 2000 मध्ये केली होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्मृती मानधना आणि प्रतिका रावल यांनी 70 धावांची भागीदारी केली. या जोडीने 2025 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 धावांचा टप्पा ओलांडला आणि इतिहास रचला.
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा काढणारी जोडी (एकदिवसीय क्रिकेट)
1028*- स्मृती मानधना आणि प्रतीक रावल 2025
905 – बेलिंडा क्लार्क आणि लिसा कीटली 2000
834 – सुझी बेट्स आणि राहेल प्रिस्ट 2015
775 – राहेल हेन्स आणि एलिसा हिली 2022
708 – लिझेल ली आणि लॉरा वोल्वार्ड 2021
सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, स्मृती मानधनाच्या शतकामुळे टीम इंडियाने 292 धावा केल्या. मानधना हिने 91 चेंडूत 14 चौकार आणि चार उत्तुंग षटकार मारून 117 धावांची धमाकेदार खेळी केली. दीप्ती शर्मानेही 40 धावांचे योगदान दिले. या भारतीय धावसंख्येसमोर ऑस्ट्रेलियाचा डाव 190 धावांवर आटोपला.
Comments are closed.