स्मृती मानधना पुन्हा ‘नंबर वन’

हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधना आयसीसीच्या महिला वन डे फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत पुन्हा ‘नंबर वन’च्या सिंहासनावर विराजमान झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन डे सामन्यात केलेल्या अर्धशतकाचा तिला रेटिंगमध्ये फायदा झाल्याचे समोर आले आहे. स्मृती मानधनाला या खेळीमुळे 7 रेटिंग गुण मिळाले अन् तिने इंग्लंडच्या नॅट सिव्हर-ब्रंटला मागे टाकत अव्वल स्थान काबीज केले.
आयसीसीच्या ताज्या क्रमवारीनुसार सध्या मानधनाकडे 735 गुण आहेत, तर सिव्हर-ब्रंट 731 गुणांसह दुसऱया स्थानावर गेल्या. मानधनाने पहिल्यांदा 2019 मध्ये आयसीसी फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते. आता 2025 मध्ये तिने दुसऱयांदा हा अव्वल क्रमांकाचा मुकुट परत मिळवला आहे.
प्रतीका आणि हरलीनची झेप
चंदिगडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या सामन्यातील उत्तम फलंदाजीचा फायदा प्रतीका रावल आणि हरलीन देओललाही झाला. रावलने 64 धावा करत चार स्थानांनी प्रगती करत 42 वे स्थान मिळवले, तर हरलीन देओलने 54 धावांची खेळी करून 43 व्या स्थानावर झेप घेतली.
स्नेह राणा 13 व्या क्रमांकावर
गोलंदाजांच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या किम गार्थ आणि अलाना किंग प्रत्येकी एक स्थानावरून जाऊन अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर पोहोचल्या आहेत. त्यांच्या कारकीर्दीतील हे सर्वोच्च स्थान आहे. हिंदुस्थानच्या स्नेह राणाने पाच स्थानांनी प्रगती केली असून, ती 13 व्या स्थानी पोहोचली आहे.
Comments are closed.