स्मृती मानधना-शैफाली वर्मा यांनी रचला इतिहास; महिला टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारी पहिली जोडी

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार सलामी जोडी स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांनी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असा पराक्रम केला आहे जो यापूर्वी कोणत्याही जोडीने साध्य केलेला नाही. टीम इंडिया सध्या श्रीलंकेच्या महिला संघाविरुद्ध घरच्या मैदानावर पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळत आहे. चौथ्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, मानधना आणि शफाली यांनी भारतीय संघाला एक शानदार सुरुवात दिली, पहिल्या विकेटसाठी 162 धावांची जबरदस्त भागीदारी करत इतिहास रचला.

स्मृती मानधना आणि शफाली वर्मा यांच्या सलामी जोडीला महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वात धोकादायक जोड्यांपैकी एक मानले जाते. महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये जोडी म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम असलेल्या मानधना आणि शेफाली यांनी आता एकत्रितपणे 3,000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. यासह, स्मृती मानधना आणि शफाली वर्मा महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3,000 किंवा त्याहून अधिक धावा करणारी पहिली जोडी बनली आहे. त्यांनी मिळून एकूण 3107 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या एलिसा हीली आणि बेथ मूनी दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांनी एकत्रित 2720 धावा केल्या आहेत.

महिला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या जोड्या –
स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा (भारत) – 3107 धावा
अलिसा हीली आणि बेथ मूनी (ऑस्ट्रेलिया) – 2720 धावा
ईशा ओझा आणि तीर्था सतीश (यूएई) – 2579 धावा
सुझी बेट्स आणि सोफी डेव्हाईन (न्यूझीलंड) – 2556 धावा
कविशा एगोडिगे आणि तीर्था सतीश (यूएई) – 1976 धावा

महिला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकी सलामी भागीदारी करण्याचा विक्रम सध्या यूएईच्या एशा ओझा आणि तीर्था सतीश यांच्याकडे आहे, ज्यांनी हा पराक्रम सहा वेळा केला आहे. दरम्यान, स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा ही सलामी जोडी आता या यादीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला सलामी जोडी एलिसा हिली आणि बेथ मुनी यांच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. मानधना आणि शफाली यांनी आता महिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये चौथ्यांदा शतकी भागीदारी केली आहे.

Comments are closed.