मुलींना समान संधी मिळण्यासाठी मी त्यांना पाठिंबा देईन! वर्ल्ड कप विजेत्या महाराष्ट्राच्या लेकीचा निर्धार

Women’s World Cup 2025 च्या अंतिम लढतीत टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला नमवलं आणि पहिल्यांदा महिलांचा वर्ल्ड कप विजेतेपदाचा जल्लोष हिंदुस्थानात साजरा झाला. याच वर्ल्ड कप विजेत्या संघातील टीम इंडियाची सलामीवीर आणि महाराष्ट्राची लेक स्मृती मनधानाची एक पोस्ट सध्या सर्वांचचं लक्ष वेधून घेत आहे. स्मृती आक्रमक फलंदाजीसाठी ओळखली जाते. त्यामुळे जगभरात तिचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचा चाहत्यांशी संवाद सुरू असतो. अशीच एक पोस्ट बालदिनाचे औचित्य साधत स्मृतीने केली आहे.
स्मृतीने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “मी जेव्हा सात वर्षांची होते, तेव्हा माझ्या भावाने दिलेली बॅट मी जेमतेम उचलू शकत होते. पण त्या क्षणामुळे मला विश्वास बसला की मी खेळू शकते आणि आयुष्यात मी मोठ्या गोष्टी साध्य करू शकते. सर्व मुलींना आणि मुलांना ती संधी मिळायला हवी. ही संधी फक्त जिंकण्यासाठी नाही तर स्वत:ची ताकद ओळखण्यासाठी मिळायला हवी.” असं स्मृती म्हणाली आहे.
याच मुद्याला धरून स्मृती पुढे म्हणाली की, “जागतिक बालदिनानिमीत्त मी वचन घेत आहे की, मी मुलींना पाठिंबा देईन, जेणेकरून त्यांना योग्य आणि समान संधी मिळेल.” असं म्हणत स्मृतीने मुलींना योग्य संधी मिळायला हवी आणि त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं निर्धार केला आहे. स्मृतीच्या पोस्टचं चाहत्यांनी कौतूक केलं आहे. 12 हजारहून अधिक लोकांनी तिची ही पोस्ट लाईक केली आहे, तर अनेकांनी शेअर सुद्धा केली आहे.
स्मृतीने संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये दमदार फलंदाजी केली. टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करुण देण्यात तिने मोलाची कामगिरी पार पाडली. स्मृतीने वर्ल्ड कपमध्ये 9 सामने खेळले आणि 434 धावा केल्या. संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये स्मृती दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होती.

Comments are closed.