स्मृती मानधना अव्वल स्थानी कायम

महिला एकदिवसीय विश्वचषकात दोन सामन्यांत निराशाजनक कामगिरी असूनही हिंदुस्थानची स्टार फलंदाज स्मृती मानधाना आयसीसी महिला एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत 791 गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे, मात्र तिची आघाडी कमी झाली आहे. इंग्लंडच्या नेट स्किव्हर ब्रंटपेक्षा ती 60 गुणांनी पुढे आहे. विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन शतके झळकावणाऱ्या स्मृतीने श्रीलंकेविरुद्ध फक्त 8 आणि पाकिस्तानविरुद्ध 23 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाची बेथ मूनी (713) तिसऱ्या, दक्षिण आफ्रिकेची ताजमिन ब्रिट्स (706) चौथ्या तर ऑस्ट्रेलियाची एश्लेग गार्डनर (697) पाचव्या स्थानी आहेत. ब्रिट्सला दोन तर गार्डनरला सात स्थानांची झेप मिळाली. न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिवाइन सात स्थानांनी पुढे जात आठव्या स्थानी तर पाकिस्तानची सिद्रा अमीन दहाव्या क्रमांकावर पोहोचली. गोलंदाजीत इंग्लंडची सोफी एकलेस्टोन (792) अव्वल असून हिंदुस्थानची दीप्ती शर्मा (640) एक स्थान घसरून सहाव्या स्थानी आहे.
Comments are closed.