हे तर पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण! बापटांवरील हल्ल्याच्या रोहित पवारांकडून निषेध
गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये डीजे आणि ढोल-ताशांच्या प्रचंड आवाजा मुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात सातत्याने लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट सातत्याने आवाज उठवत आहेत. अनेकांना हा निर्णय मान्य नसून याच रागातून एका अज्ञात व्यक्तीकडून विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी हल्ला करण्यात आला आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेविरोधात संताप व्यक्त केला आहे. बापट यांनी मांडलेल्या भूमिकेला तार्किक दृष्टीकोनातून बघण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करणे हे पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण असल्याची टीका रोहित पवार यांनी केला आहे.
गणेशोत्सवातील डीजे संदर्भात विद्यानंद बापट यांनी मांडलेल्या भूमिकेला तार्किक दृष्टीकोनातून बघण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करणे हे पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. मतभेद असू शकतात, त्यांची भूमिका पटत नसेल तर वैचारिक विरोध करा, बापट ज्याप्रमाणे विचाराने भूमिका मांडतात त्याप्रमाणे…
– रोहित पवार (@RRPSpeaks) 3 सप्टेंबर 2026
रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आपली भूमिका मांडताना म्हटले की, गणेशोत्सवातील डीजे संदर्भात विद्यानंद बापट यांनी मांडलेल्या भूमिकेला तार्किक दृष्टीकोनातून बघण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला करणे हे पिसाटलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे. एखाद्या विषयावर मतभेद असणे स्वाभाविक आहे. जर त्यांची भूमिका पटत नसेल, तर त्याला वैचारिक मार्गाने विरोध करा. बापट ज्याप्रमाणे सनदशीर आणि विचारांच्या पातळीवर भूमिका मांडतात, त्याचप्रमाणे विरोधकांनीही आपली भूमिका मांडायला हवी. परंतु अशाप्रकारे गुंडगिरीचा वापर केला जाणार असेल, तर हे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. पोलीस प्रशासनाने बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या गावगुंडांवर तातडीने कडक कायदेशीर कलमांनुसार कारवाई करावी आणि विद्यानंद बापट यांना तात्काळ पोलीस संरक्षण पुरवावे, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली.
पुण्यात असे हल्ले नवीन नाहीत. काल दाभोळकर होते, आज बापट आहेत
सामाजिक सुधारणांची आणि सौहार्दाची भूमी असलेल्या पुण्यात विरोधात बोललात, तर तुमचा ‘पंडित’ आणि ‘बापट’ करू, असा संदेश सरकारकडून दिला जात आहे का?
पुण्यात असे हल्ले नवीन नाहीत. काल दाभोळकर होते, आज बापट आहेत. त्यामुळे गावगुंडांच्या मदतीने हल्ले करून तर्काची लढाई थांबवता येईल, या…
– रोहित पवार (@RRPSpeaks) 3 सप्टेंबर 2026
आपल्या पोस्टमध्ये पुढे बोलताना रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावरही गंभीर प्रश्न उपस्थित केले. पुणे ही सामाजिक सुधारणा आणि सौहार्दाची भूमी आहे, मात्र ‘विरोधात बोललात तर तुमचा पंडित आणि बापट करू’ असा संदेश सरकारकडून दिला जात आहे का, असा सवाल त्यांनी विचारला. पुण्यात अशा पद्धतीचे हल्ले होणे ही नवीन बाब उरलेली नाही, काल दाभोळकर होते आणि आज बापट आहेत. गावगुंडांच्या मदतीने हल्ले करून विचारांची आणि तर्काची लढाई थांबवता येईल, या भ्रमात सरकारने राहू नये, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच उद्या पत्रकारांच्या बाबतीतही सरकारकडून असाच प्रकार घडू शकतो, अशी भीती रोहित पवार यांनी व्यक्त केली.
CET सेलचा 4.5 लाख विद्यार्थ्यांचा डेटा लीक
राज्यातील MH-CET मध्ये Percentile घोटाळा तर झालेलाच आहे, त्यासोबत विद्यार्थ्यांचा अतिशय गोपनीय असा डेटा सुद्धा CET सेल मधून 4.5 लाख विद्यार्थ्यांची नावे, परीक्षा केंद्र, कोणत्या ग्रुपसाठी परीक्षा दिली, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी यासारखी गोपनीय माहिती असलेला गोपनीय डेटा लीक…
– रोहित पवार (@RRPSpeaks) 3 सप्टेंबर 2026
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET Cell) कारभारावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राज्यातील MH-CET परीक्षेतील पर्सेंटाईल घोटाळ्यापाठोपाठ आता तब्बल 4.5 लाख विद्यार्थ्यांचा अतिशय गोपनीय डेटा लीक झाल्याचा खळबळजनक आरोपही रोहित पवार यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, राज्यात ना परीक्षा पारदर्शक राहिल्या आहेत ना विद्यार्थ्यांचा डेटा सुरक्षित राहीला आहे, एकंदरीतच राज्यात सर्वत्र अनागोंदी माजली असून भ्रष्टाचार बोकाळला आहे, परिणामी राज्य administrative failure च्या उंबरठ्यावर येऊन पोचले आहे. राज्यातील CET सेल मधून विद्यार्थ्यांचा डेटा लीक झाल्याची ही बाब अतिशय गंभीर असून यासंदर्भात उद्या सकाळी 11 वाजता CET सेल, मुंबई येथे जाब विचारण्यासाठी विद्यार्थी. पालक आणि शिक्षकांच्या समवेत उपस्थित राहणार असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
Comments are closed.