शिरसाट यांच्या बंगल्यावर हल्ला; कोणीच दखल न घेतल्याने, आयुक्तांनी फोन न उचलल्याने संतापले
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि जिह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर गुरुवारी रात्री हल्ला करण्यात आला. तीन तरुणांनी दगड, काचेच्या बाटल्या फेकत बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता झटापट होऊन त्यात दोन सुरक्षा रक्षक जखमी झाले. या घटनेनंतर शिरसाट यांनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना फोन केला. मात्र त्यांनी फोन न उचलल्याने शिरसाट संतापले.
तीन तरुण माझ्या निवासस्थानाबाहेर आले. ते दारूच्या नशेत असल्याचे दिसत होते. त्यांनी तिथे बाटल्या फोडल्या. अनेक ओएसडी आमच्या खिशात आहेत, अशी धमकी त्यांनी सुरक्षारक्षकांना दिली आणि घराच्या दिशेने धावून जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलीस नक्की काय करत आहेत? पोलीस आयुक्तांचा फोन बंद आहे आणि एकही डीसीपी किंवा एसीपी तिथे नाही. पालकमंत्र्यांच्या निवासस्थानावर हल्ला होत आहे, पोलिसांनी किमान याची दखल तरी घ्यावी, अशी संतप्त प्रतिक्रिया शिरसाट यांनी दिली.
जर पालकमंत्रीच सुरक्षित नसेल तर सामान्यांचे काय, असा सवाल करताना शिरसाट यांनी पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केले. राजरोस ड्रग विक्री होते, दिवसाढवळ्या हत्या होताहेत, पण त्याचं पोलीस आयुक्तांना काहीच गांभीर्य नाही. त्यामुळे आयुक्तांना इथून तत्काळ हलवलं पाहिजे, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, याप्रकरणी रोहित भुताळे, शिवम गायकवाड, प्रतीक कुंटे या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
शिरसाट सरकारमध्ये आहेत ना?
शिरसाट यांच्या आरोपांना भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी उत्तर दिले. तुम्ही सरकारमध्ये आहात ना? एखाद्या घटनेवरून मंत्रीच जर सरकारला दोष देत असेल तर ते योग्य नाही, असे सावे म्हणाले.
Comments are closed.