सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रजत दलाल अडकला विवाह बंधनात; गुपचूप उरकले लग्न
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि पॉवरलिफ्टर रजत दलाल याने रविवारी 29 मार्च 2026 रोजी आपल्या लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. ‘बिग बॉस 18’ मुळे घराघरात पोहोचलेल्या रजतने अत्यंत गुप्त पद्धतीने हा विवाहसोहळा पार पाडला असून, इन्स्टाग्रामवर फोटो समोर येताच ते सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आहेत. आयुष्याच्या एका नवीन पर्वाची सुरुवात, असे कॅप्शन देत रजतने आपल्या जोडीदारासोबतचे सुंदर क्षण सर्वांसोबत शेअर केले आहेत.
रजतने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये हे नवदाम्पत्य एखाद्या राजघराण्यातील जोडीसारखे दिसत आहे. नदीकाठी पार पडलेल्या या सोहळ्यात रजत आणि त्याची वधू राजा-राणीच्या थाटात पाहायला मिळत आहेत. लग्नासाठी रजतने ऑफ-व्हाइट रंगाची भरजरी शेरवानी परिधान केली होती, ज्यावर पगडी आणि मोत्यांचा हार त्याच्या लूकला अधिकच देखणा बनवत होता. तर त्याच्या पत्नीने सोनेरी नक्षीकाम असलेला गडद लाल रंगाचा पारंपरिक लेहेंगा परिधान केला होता. लाल लेहेंग्यासोबत तिने घातलेला हिरव्या खड्यांचा हार आणि कपाळावरील बिंदीमुळे वधूचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं.
फुलांच्या कमानी आणि मंद रोषणाईने सजवलेल्या मोकळ्या हवेतील मंडपात हा विवाहसोहळा संपन्न झाला. हातामध्ये हात धरून उभी असलेली ही जोडी आणि आजूबाजूला पडणाऱ्या गुलाबाच्या पाकळ्यांमुळे संपूर्ण वातावरण एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे स्वप्नवत वाटत होते. फुलांनी सजवलेल्या मंडपाखाली दोन्ही हात उंचावून आपल्या नवीन आयुष्याचा आनंद साजरा केला. या जोडीच्या फोटोंनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला असून, चाहत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments are closed.