सोलापूर हादरलं ! क्षुल्लक कारणावरून सावत्र आईनं 3 वर्षांच्या चिमुकलीला संपवलं

Solapur Crime : “जेवण करत नाही आणि शाळेत जात नाही,” अशा क्षुल्लक कारणावरून 3 वर्षांच्या चिमुकलीचा सावत्र आईने गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मोहोळ तालुक्यातील वडवळ येथे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मुलीचा छळ आणि तिच्या मृत्यूमागील क्रूरता समोर आल्यानंतर संताप व्यक्त केला जात आहे.

ही संतापजनक घटना शुक्रवारी (1 ऑगस्ट) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. मृत मुलीचे नाव कीर्ती नागेश कोकणे (वय ३) असे असून, तिची सावत्र आई तेजस्विनी नागेश कोकणे (वय ३३) हिनेच तिचा जीव घेतल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपी तेजस्विनीला अटक केली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, नागेश कोकणे हे आपल्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या पत्नी तेजस्विनी हिच्यासह वडवळ स्टॉप येथे भाड्याने राहतात. त्यांच्या बरोबर पहिल्या पत्नीपासून झालेल्या दोन मुली कीर्ती आणि आकृतीही राहत होत्या. गेल्या काही महिन्यांपासून तेजस्विनी या दोन्ही मुलींवर मानसिक आणि शारीरिक अत्याचार करत होती. ती मुलींना क्षुल्लक कारणावरून मारहाण करत असल्याचे शेजाऱ्यांनीही यापूर्वी वेळोवेळी सांगितले होते.

शुक्रवारी सकाळी कीर्तीने नाश्ता करण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या तेजस्विनीने तिला अमानुषपणे मारहाण केली आणि नंतर गळा दाबून तिची हत्या केली. घटनेनंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला.

या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलप यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तेजस्विनी कोकणे हिच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस अधिक तपास करत असून, घरातील इतर सदस्यांचीही चौकशी सुरू आहे.

ही घटना अत्यंत वेदनादायी असून, समाजात अजूनही सावत्र नात्यांतील विष, क्रौर्य आणि निर्दयता किती भयंकर स्वरूप धारण करू शकते, याचा हा जिवंत दाखला आहे. वडवळसारख्या छोट्या गावात अशा प्रकारचा प्रकार घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीती आणि चीड निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणात कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून

होत आहे.

आणखी वाचा

Comments are closed.