मुदत संपल्यानंतर भाजपने एबी फॉर्म जमा केले, मविआसह शिंदे गटाचा आरोप, निवडणूक आयुक्तांना नोटीस

सोलापूर महानगरपालिका निवडणूक बातम्या: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात मुख्य निवडणूक आयुक्तांना महाविकास आघाडीच्या वतीनं लीगल नोटीस देण्यात आली आहे. भाजपने दुपारी तीन  वाजल्यानंतर म्हणजे अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर एबी फॉर्म जमा केल्याचा आरोप महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गटानं केली आहे. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी या प्रकारणात भाजपच्या बाजूने निर्णय देत असल्याचा आरोप लीगल नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्तांनी या प्रकारणात लक्ष घालून चौकशी करावी

मुख्य निवडणूक आयुक्तांनी या प्रकारणात लक्ष घालून चौकशी करावी अशी मागणी या कायदेशीर नोटीसच्या माध्यमातून करण्यात आली आहे. दरम्यान या नोटीसची प्रत मनपा आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांना देण्यात आली  असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे आणि काँग्रेसचे प्रवक्ते अशोक निंबर्गी यांनी दिली आहे.

हा संपूर्ण प्रकार बेकायदेशीर असून निवडणूक निर्णय अधिकारी देखील भाजच्याच बाजूने : अॅड असीम सरोदे

दरम्यान, या प्रकरणावर अॅड असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपच्या उमेदवारांना दुपारी तीन नंतर खिडकीतून कागदपत्रे पुरवण्यात आली असल्याचे सरोदे म्हणाले. हा संपूर्ण प्रकार बेकायदेशीर असून निवडणूक निर्णय अधिकारी देखील भाजच्याच बाजूने निर्णय देत असल्याचे असीम सरोदे म्हणाले. त्या स्वतः मान्य करतात की तीन नंतर खिडकीतून कागदपत्रे आली आहेत. मात्र ते एबी फॉर्म असल्याचे सिद्ध होत नाही म्हणत त्यांनी अर्ज वैध ठरवले आहेत. हे संपूर्णपणे बेकायदेशीर आहे, अशा पद्धतीने दुपारी तीन वाजता मुदत संपल्यावर कागदपत्रे देता येऊ शकतं नाही असे असीम सरोदे म्हणाले. त्यामुळे आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी, मनपा आयुक्त आणि राज्य निवडणूक आयुक्त यांना कायदेशीर नोटीस पाठवल्याची माहिती असीम सरोदे यांनी दिली.

दरम्यान, दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असताना भाजपने तीन वाजून पाच मिनिटांनी एबी फॉर्म दिल्याची तक्रार काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि ठाकरे गटानं केली आहे. दरम्यान भाजपने याप्रकरणी आपली बाजू मांडलेली असून आम्ही एबी फॉर्म आधीच जमा केले असून केवळ पोहोच घेण्यासाठी आलो होतो असा दावा केला होता. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नसून निर्णय अधिकारी काय अहवाल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! सोलापुरात भाजपने कमी जागा दिल्या, शिंदेंच्या शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत युती; भाजपविरुद्ध फॉर्म्युलाही ठरला

आणखी वाचा

Comments are closed.