Solapur MIDC Fire in factory 8 people died
सोलापूर : सोलापूर शहारातील अक्कलकोट महामार्गावरील एमआयडीसीत एका टॉवेल कारखान्यात लागलेल्या भीषण आगीत श्वास गुदमरून आणि होरपळून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या आगीत सेंट्रल हँडलूम इंडस्ट्रीजचे मालक 78 वर्षीय उस्मान मन्सूरी, त्यांचा मुलगा 25 वर्षीय अनस मन्सूरी, त्यांची 24 वर्षीय पत्नी शिफा आणि त्यांचा एका वर्षाचा मुलगा युसूफ असे संपूर्ण कुटुंबचा यामध्ये मृत्यू झाला. याशिवाय कारखान्यातच राहणारे कामगार 51 वर्षीय मेहताब बागवान, 45 वर्षीय आयेशा बागवान, 35 वर्षीय हिना बागवान आणि 18 वर्षीय सलमान बागवान यांचाही आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. (Solapur MIDC Fire in factory 8 people died)
मृतांमध्ये एकूण ५ पुरुष, २ महिला आणि एका बालकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. अग्निशमन दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल आणि एनटीपीसीच्या जवानांनी आगीवर तब्बल 12 तासानंतर नियंत्रण मिळवले. या घटनेने सोलापुरातून हळहळ व्यक्त होत आहे. आगीच्या वर्दीनंतर महापालिकेची यंत्रणा आग विझवण्यात तोकडी पडल्याचा आरोप होत आहे. आग विझवण्यासाठी पाणीही कमी पडले. या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी अशी विनंती राज्य सरकारकडे करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (18 मे) पहाटे 4 वाजेच्या सुमारास सेंट्रल हँडलूम टॉवेल कारखान्यातील कच्च्या मालाला आग लागली. कारखान्याचे मालक उस्मान हसन मन्सुरी आणि त्यांच्या कुटुंबातील पाचहीजण कारखान्यातच राहायला होते. तसेच इतर 4 कामगारही त्याच ठिकाणी राहत होते. अत्यंत कमी वेळेत आग भडकल्याने आतमध्ये अडकलेल्या आठही जणांना बाहेर पडणेही मुश्कील झाले.
आगीची वर्दी मिळताच अक्कलकोट एमआयडीसी केंद्रातील सोलापूर महापालिकेच्या अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी तातडीने दाखल झाला. परंतु, आगीचे रौद्ररूप पाहताच पंढरपूर, अक्कलकोट नगरपालिका, चिंचोली एमआयडीसी आणि एनटीपीसी इत्यादी ठिकाणाहून अग्निशमन बंब बोलवण्यात आले. तरीही अग्निशामक दलाच्या जवानांचे प्रयत्न तोकडे पडत होते. आग भडकत असताना पाणीही अपुरे पडत होते. जिल्हाधिकार्यांना फोन करुन खासगी टँकरनी पाणी मागवून घेण्यात आले. सकाळी बागवान कुटुंबातील तिघांचे मृतदेह हाती लागले. यानंतर कारखान्याच्या मालकांचा शोध सुरु झाला. परंतु बेडरुममध्ये लपून बसलेल्या चौघांचेही मृतदेह दुपारी हाती लागले. सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास ही आग आटोक्यात आली. सर्व आठही मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
Comments are closed.