मंत्री गोगावलेंसमोरच शिंदे गटातील गटबाजी चव्हाट्यावर, सोलापूरमध्ये आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये राडा

सोलापूर दौऱ्यावर असलेले शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्या समोरच दोन गट भिडले. यामुळे मोठा राडा झाला. गोगावले सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी स्थानिक कार्यालयाला भेट दिली. यावेळी जिल्हाप्रमुख मनिष काळजे हे कार्यालयात गोगावले यांचा सत्कार करीत होते. त्यावेळी माजी शहर प्रमुख मनोज शेजवळ तिथे आले. गोगावले यांना मुद्दामहून बसवून घेत असल्याचा आरोप शेजवळ यांनी केला. त्यावर काळजे यांनी ठरल्याप्रमाणे दौरा सुरू आहे, असे उत्तर दिले. या उत्तराने भडकलेल्या शेजवळ यांनी काळजे यांच्यावर हात उचलला. फ्री स्टाईल हाणामारी होण्याची शक्यता लक्षात घेत मंत्री गोगावले यांनी शेजवळ यांना हात धरून बाजूला केले.

भरत गोगावले यांच्या स्वागतासाठी इतर पदाधिकारी शासकीय विश्रामगृहावर थांबून होते. बराच वेळ झाला तरी ते शासकीय विश्रामगृहावर येत नाहीत म्हणून माजी शहर प्रमुख मनोज शेजवाळ हे काळजे यांच्या कार्यालयाकडे आले. आत आल्यानंतर एवढा वेळ का? असे त्यांनी विचारले असता दौरा हा वेळेनुसार सुरू असल्याचे काळजे यांनी सांगितले.

मात्र, यावेळी पुन्हा वेळ लागत असल्याने शेजवळ यांनी काळजे यांच्यावर हात उगारला. मंत्री गोगावले यांनी मध्यस्थी करत या दोघांमधील भांडण सोडवले. अन्यथा या ठिकाणी मोठा वाद झाला असता. शिवसेनेमधील अंतर्गत गटबाजी यावेळी समोर आली आहे. मनिष काळजे यांचा स्वतंत्र गट असून इतर नेत्यांचा वेगळा गट पाहायला मिळतो.

Comments are closed.