अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत सोलापूर स्मॅशर्सचा दुसरा विजय

पुणे, 8 जून 2025: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग (डब्लूएमपीएल) 2025 स्पर्धेत पाचव्या दिवशी पाचव्या लढतीत कर्णधार तेजल हसबनीस (56 धावा) हिने झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर सोलापूर स्मॅशर्स संघाने रायगड रॉयल्स संघाचा 7 गडी राखून पराभव करत आपली विजयी मालिका कायम ठेवली.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत रायगड रॉयल्स संघाने पहिल्यांदा खेळताना रायगड रॉयल्स संघाने 20 षटकात 6 बाद 129 धावा केल्या. भाविका आहिरे 11 धावावर तंबूत परतली. शरयू कुलकर्णीने भाविका आहिरेला झेल बाद केले. श्रावणी देसाईने एकाबाजूने लढताना 45 चेंडूत 43 धावांची संयमी खेळी केली. तिने 3 चौकार व 2 षटकार खेचले. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 36 चेंडूत 31 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रायगडचे फलंदाज फारशी मोठी खेळी करू शकले नाही. किरण नवगिरे (18), आदिती गायकवाड (नाबाद 16), यशोदा घोगरे (18) यांनी धावा केल्या. सोलापूर स्मॅशर्सकडून लक्ष्मीदेवी यादवने 13 धावात 2 गडी तर, शरयू कुलकर्णी (1-17), आचल अगरवाल(1-14) यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

सोलापूर स्मॅशर्स संघाने हे आव्हान 17.2 षटकात 3 बाद 130 धावा करून पूर्ण केले. ईश्वरी अवसरे (0) खाते न उघडताच तंबूत परतली. तिला इशा पाठारेने झेल बाद केले. त्यानंतर कर्णधार तेजल हसबनीसने चौफेर फटकेबाजी करत रायगडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. तिने 36 चेंडूत 8 चौकार व 2 षटकार मारून 56 धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

याबरोबरच स्पर्धेत तिने दुसरे अर्धशतक झळकावताना आतापर्यंत 3 सामन्यात सर्वाधिक 112 धावा केल्या आहेत. तेजलने ईश्वरी अवसरे (33 धावा) च्या समवेत दुसऱ्या विकेटसाठी 35 चेंडूत 73 धावांची भागीदारी करून संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. प्रज्ञा वीरकरने तेजल हसबनीसला आक्रमक फटका मारताना झेल बाद केले. यशोदा घोगरेने लॉंग ऑफला अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर मुक्ता मगरेने 27 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 34 धावांची खेळी करून संघाला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

रायगड रॉयल्स: 20 षटकात 6 बाद 129 धावा (श्रावणी देसाई 43(45,3×4,2×6), किरण नवगिरे 18, आदिती गायकवाड नाबाद 16, यशोदा घोगरे 18, भाविका अहिरे 11, लक्ष्मीदेवी यादव 2-13, शरयू कुलकर्णी 1-17, आचल अगरवाल 1-14) पराभुत वि.सोलापूर स्मॅशर्स: 17.2 षटकात 3 बाद 130 धावा (तेजल हसबनीस 56 (36, 8×4, 2×6), ईश्वरी अवसरे 33 (38, 3×4), मुक्ता मगरे नाबाद 34 (27,4×4), प्रज्ञा वीरकर 1-27, इशा पाठारे 1-23); सामनावीर – तेजल हसबनीस

Comments are closed.