किशतवार चकमकीत सैनिक शहीद

दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

मंडळ/श्रीनगर

जम्मू काश्मीरमधील किश्तवाडमध्ये गुरुवारी संध्याकाळी उशिरापर्यंत दहशतवादी आणि लष्करी जवानांमध्ये चकमक सुरू होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरक्षा दलांनी  दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. तथापि, या चकमकीत एक जवान हुतात्मा झाला आहे. तसेच अन्य दोघे जवान गोळीबारात जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. किश्तवाडमधील छत्रू येथील सिंगपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी सकाळी चकमक सुरू झाली होती. दहशतवाद्यांचा मागमूस लागल्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने त्यांना घेरले. जवानांनी सुरुवातीला दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला. मात्र, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू करताच चकमक सुरू झाली. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत येथे जोरदार संघर्ष व शोधमोहीम सुरू होती. सैन्याच्या 11 राष्ट्रीय रायफल्स, 2 पॅरा स्पेशल फोर्स, 7 वी आसाम रायफल्स आणि किश्तवाड एसओजीच्या (विशेष मोहीम पथक) संयुक्त टीमने सिंघपोराच्या जंगलांमध्ये शोधमाहीम सुरू केल्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, याच्या प्रत्युत्तरादाखल चकमक झाली आहे.

चकमकस्थळी 3-4 दहशतवादी लपल्याचा संशय आहे. यातील एका दहशतवाद्याची ओळख पटली असून त्याचे नाव सैफुल्लाह आहे. अन्य दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते. दहशतवाद्यांचे पलायन रोखण्यासाठी सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. मागील आठवड्यात पुलवामा जिल्ह्याच्या त्राल भागातील नादिर गावात सुरक्षादलांनी जैश-ए-मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. आसिफ अहमद शेख, आमीर नीर वाणी आणि यावर अहमद भट अशी त्यांची नावे होती. हे सर्व दहशतवादी पुलवामाचेच रहिवासी होते. तर शोपियांच्या जिनपाथर केलर भागात झालेल्या एका चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे तीन दहशतवादी मारले गेले होते. यातील दोन जणांची शाहिद कुट्टे आणि अदनान शफी अशी ओळख पटली होती. 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर दक्षिण काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. तसेच सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या विरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाने दहशतवाद्यांशी निगडित लोकांची संपत्ती जमीनदोस्त करण्याची मोहीम सुरू केली आहे.

Comments are closed.