Some leaders may feel that I am falling short somewhere MLA Rohit Pawar expressed his displeasure


मुंबई – राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. यावेळी विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलत असताना राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मी एकटाच नाराज नाही तर राज्यातील जनता नाराज असल्याचे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यावरुन रोहित पवार हे पक्षामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यासोबतच पक्षात गेल्या सात वर्षांपासून काम करत आहे, मात्र वरिष्ठ नेत्यांकडून आपल्याला संधी मिळत नाही, अशीही तक्रार त्यांनी यावेळी व्यक्त केली.

मी कुठेतरी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटत असावं

आमदार रोहित पवार म्हणाले की, अख्खा महाराष्ट्र या सरकावर नाराज आहे. त्यासोबतच विरोधी पक्षावरही नाराज आहे. विरोधी पक्ष सरकारच्या धोरणांवर बोलत नाही, अशी स्वपक्षीयांसह महाविकास आघाडीतील नेत्यांबद्दलही रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. संपूर्ण महाराष्ट्र नाराज आहे. आणि मीही नाराज आहे असे म्हटल्यास काही वावगे होणार नाही, असेही रोहित पवार म्हणाले. तसेच सात वर्षांपासून पक्षात काम करत आहे, मात्र मला काम दिले जात नाही. मी कुठेतरी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटत असावं, असंही रोहित पवार म्हणाले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रोहित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातील धुसफूस नेहमीच समोर येत आली आहे. आज रोहित पवार यांनी विरोधी पक्षाचे नेते सरकावर टीका करत नसल्याचे म्हटले आहे. यावेळी त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

नेमकं काय म्हणाले होते राहित पवार?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत शॅडो कॅबिनेट स्थापन करण्यात आली. पक्षातील अनेक नेत्यांना विविध महसूल विभागांची जबाबदारी देण्यात आली. महायुती सरकारच्या 100 दिवसांच्या कामांवर नजर ठेवण्याचे काम या नेत्यांना देण्यात आले आहे. यामध्ये रोहित पवारांना कोणत्याही समितीमध्ये स्थान देण्यात आले नाही. यासंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्वावर रोहित पवार म्हणाले, ‘मी आजारी असल्यामुळे मला त्या बैठकीला जाता आलं नाही. त्यामुळे त्या बैठकीत काय चर्चा झाली हे मला सांगता येणार नाही. मात्र, अजूनपर्यंत कुठलीही जबाबदारी माझ्यापर्यंत आलेली नाही. तसेच मला कोणती जबाबदारी दिलेली आहे हे मला कळालेलं नाही. मला जबाबदारी दिली नाही म्हणून मी नाराज आहे असा विषय नाही. माझं म्हणणं एकच आहे की आज लढण्याचे दिवस आहेत, त्यामुळे लढलं पाहिजे. आता राहिला प्रश्न की गेले ७ वर्ष पक्षाच्यावतीने मी लढत असताना मी कुठेतरी कमी पडतोय असं काही नेत्यांना वाटत असावं त्यामुळे त्यांनी तसा निर्णय घेतला असावा. तसेच काही महत्वाचा निर्णय उद्या घ्यायचा असेल तेव्हा तो निर्णय घेतला जाईल. पण त्या बैठकीत काय चर्चा झाली हे मला सांगता येणार नाही. मी तुम्हाला एवढंच सांगतो की, मी एक आमदार म्हणून पक्षाचा पाठिंबा असला काय आणि नसला काय? पण सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी मी लढत आलो आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मला शरद पवारांचा पाठिंबा राहिलेला आहे. त्यांचा पाठिंबाच माझ्यासाठी सर्वकाही आहे.’

रोहित पवार काही महिन्यांपासून पक्षात नाराज – सुनीळ शेळके 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवारांचे वक्तव्य मोडतोड करुन दाखवले जात असल्याचे म्हटले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी रोहित पवार कधीही सत्तेत सहभागी होऊ शकतात. ते गेल्या काही महिन्यांपासून शरद पवार गटात नाराज असल्याचा दावा केला आहे.

आमदार सुनील शेळके म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून आमदार रोहित पवार नाराज आहेत. त्यांना पक्षात डावलले जात आहे. रोहित पवारांना त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व्हायचे आहे. मात्र त्यांना संधी दिली जात नाही. त्यामुळे ते नाराज आहेत, असंही आमदार सुनील शेळके म्हणाले. यामुळे येत्या काळात रोहित पवार हे वेगळी भूमिका घेतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा : Rohit Pawar : कोरटकरला पोलीस संरक्षण, सोलापूरकरची समितीवर निवड; फडणवीसांचा महाराजांबद्दल हाच आदर का?



Source link

Comments are closed.