कोहलीच्या बाबतीत आयपीएलमध्ये पहिल्यांदाच घडला 'हा' प्रकार; चाहत्यांना बसला मोठा धक्का
आयपीएल २०२६ च्या २३ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) हे संघ आमनेसामने आहेत. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, टॉस झाल्यानंतर आरसीबीच्या ‘प्लेइंग इलेव्हन’मधून स्टार फलंदाज विराट कोहलीचे नाव गायब असल्याचे पाहून चाहते थक्क झाले. कर्णधार पाटीदारने या सामन्यासाठी कोहलीचा अंतिम ११ खेळाडूंमध्ये समावेश केलेला नाही.
खरे तर, आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीला त्याच्या १९ वर्षांच्या प्रदीर्घ आयपीएल कारकिर्दीत पहिल्यांदाच ‘इम्पॅक्ट सबस्टिट्यूट’ (Impact Substitute) म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. कोहली जरी प्लेइंग ११ च्या बाहेर असला, तरी तो सामन्याच्या दुसऱ्या डावात आरसीबीसाठी फलंदाजी करताना दिसू शकतो. मात्र, हा निर्णय कोणत्याही रणनीतीचा भाग नसून कोहलीच्या फिटनेसमुळे घेण्यात आला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात कोहली जखमी झाला होता. घोट्याला दुखापत झाल्यामुळे तो दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता.
दुखापत होण्यापूर्वी त्याने फलंदाजी करताना ३८ चेंडूत शानदार ५० धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावात त्याच्या जागी जॅकब बेथेल बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात दिसला होता. यामुळे चाहते त्याच्या फिटनेसबाबत थोडे चिंतेत होते. पण समाधानाची बाब म्हणजे कोहली आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि लखनऊविरुद्ध फलंदाजी करण्यासाठी तो मैदानात उतरू शकतो.
लखनऊविरुद्ध टॉस जिंकल्यानंतर रजत पाटीदार म्हणाला, “आम्ही प्रथम गोलंदाजी करू. पिच खूप चांगले दिसत आहे, त्यामुळे आम्हाला आधी गोलंदाजी करायला आवडेल. पहिल्या डावात खेळपट्टीकडून थोडी मदत मिळण्याची अपेक्षा आहे. गेल्या सामन्यात खेळपट्टीवर खूप गवत होते, पण मला वाटते या विकेटवर गवत नाहीये. हे एक चांगले खेळपट्टी असेल. मला वाटते की प्रत्येकजण संघासाठी चांगली कामगिरी करत आहे. प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या प्रसंगी खेळाडूंनी येऊन संघासाठी योगदान दिले आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे.” संघातील बदलाबाबत पाटीदारने सांगितले की, टीममध्ये एक बदल झाला असून जॅकब डफीच्या जागी जोश हेझलवूड संघात आला आहे.
Comments are closed.