आयपीएल इतिहासात दुसऱ्यांदाच घडणार अस काही; हैदराबादच्या एक निर्णयामुळे बदलणार समीकरण

टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली. आता येत्या २८ मार्चपासून जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आयपीएल २०२६ स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेची सुरूवात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्याने होणार आहे. मात्र, यावेळची आयपीएल स्पर्धा खास असणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात केवळ दुसऱ्यांदाच सर्व १० संघांचे कर्णधार हे भारतीय असणार आहेत.

आयपीएल स्पर्धा सुरू होऊन १९ वर्षे झाली आहेत. पण या १९ वर्षांत केवळ दुसऱ्यांदाच असा योग पाहायला मिळणार आहे. जेव्हा सर्व १० संघांमध्ये एकही परदेशी कर्णधाराचा समावेश नसेल. याआधी २०१९ मध्ये झालेल्या हंगामात असा योग जुळून आला होता. त्यावेळी सनरायझर्स हैदराबाद संघाची जबाबदारी केन विलियम्सनकडे सोपवण्यात आली होती. पण दुखापतग्रस्त असल्यामुळे तो सुरूवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता. त्यामुळे केन विलियम्सनच्या अनुपस्थितीत सनरायझर्स हैदराबाद संघाची जबाबदारी भारतीय गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडे सोपवण्यात आली होती. त्यामुळे स्पर्धेची सुरूवात सर्व १० भारतीय कर्णधारांसह झाली होती.

आता पुन्हा एकदा असाच काहीसा योग जुळून आला आहे. यावेळी देखील आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू होण्याआधी सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार बदलण्यात आला आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाची जबाबदारी पॅट कमिन्सकडे सोपवण्यात आली आहे. पण तो पूर्णपणे फिट होऊ न शकल्याने ही जबाबदारी स्फोटक फलंदाज इशान किशनकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी अभिषेक शर्माकडे सोपवण्यात आला आहे. आता पॅट कमिन्स केव्हा परतणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Comments are closed.