बिहार निवडणुकीत काहीतरी चूक झाली.
जनसुराज पक्ष नेते प्रशांत किशोर यांचा दावा : आकडेवारी फीडबॅकशी जुळत नाही
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहार विधानसभा निवडणुकीत जनसुराज पक्षाच्या दारुण पराभवावर प्रशांत किशोर यांनी पुन्हा वक्तव्य केले. या निवडणुकीत काहीतरी चुकीचं घडलंय. परंतु माझ्याकडे हे सिद्ध करणारे पुरावे नाहीत. निवडणूक प्रक्रियेत असे काही तरी घडले आहे, जे पटणारे नाही. आकडेवारी आणि मतदानाचा पॅटर्न वास्तविक फीडबॅकशी जुळणारा नसल्याचा दावा प्रशांत यांनी केला आहे.
मतदानाचा कल पाहता प्रत्यक्षात मिळालेला प्रतिसाद त्याच्याशी जुळत नाही. निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी रालोआ सरकारने महिलांना प्रत्येकी 10 हजार रुपयांचे वाटप केल्याने मतदार प्रभावित झाल्याचा दावा प्रशांत किशोर यांनी केला.
लालूप्रसादांच्या जंगलराजची भीती
निवडणूक इतिहासात पहिल्यांदाच मतदानापूर्वी 50 हजार महिलांना (जीविका दीदी योजना) पैसे पाठविण्याचा प्रकार घडला. हा निवडणुकीचा निकाल ठरविणारा पहिला घटक होता. तर दुसरा घटक लालूप्रसाद यादव ठरले. लालूप्रसादांच्या काळातील जंगलराज पुन्हा येऊ नये म्हणून लोकांनी रालोआला मतदान केले. निवडणुकीपूर्वी जनसुराजला 10-20 टक्के मते मिळतील असा अनुमान होता, परंतु अखेरीस जनसुराज विजयी होणार नसल्याचे वाटल्याने लोकांनी आम्हाला मतदान करणे टाळले. जंगलराजच्या भीतीने लोकांनी जनसुराजपासून अंतर राखल्याचे प्रशांत किशोर म्हणाले.
अदृश्य शक्ती
या निवडणुकीत काही अदृश्य शक्तीही काम करत होत्या. ज्या पक्षांविषयी लोकांना माहिती देखील नव्हती, त्यांना लाखो मते मिळाली. ईव्हीएमची तक्रार करण्याची सूचना लोक मला करत आहेत. परंतु यासंबंधी कुठलाच पुरावा नाही. प्राथमिक स्वरुपात काहीतरी चुकीचे घडलेय असे वाटते, परंतु नेमके काय हे मी आताच सांगू शकत नसल्याचे उद्गार किशोर यांनी काढले.
टीकाकारांना प्रत्युत्तर
निवडणुकीतील पराभवानंतर राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना प्रशांत किशोर यांनी चोख प्रत्युत्तर दिले. जे लोक आज माझ्या राजकीय कारकीर्दीला श्रद्धांजली वाहत आहेत, हेच लोक यापूर्वी माझ्या विजयानंतर टाळ्या वाजवत होते. जे लोक माझ्यावर टीका करतात, प्रत्यक्षात ते माझ्याविषयी अधिक जाणू घेऊ पाहत आहेत. याचा अर्थ मी अद्याप संपलेलो नाही, कहाणी अद्याप बाकी आहे असे किशोर यांनी म्हटले.
Comments are closed.