गुजरातमधील सोमनाथ 'स्वाभिमान पर्व'

गुजरातमधील सोमनाथ ‘स्वाभिमान पर्व’ सोहळ्यात पंतप्रधान मोदींचे सुतोवाच : मंदिरात पूजा-अर्चा, उपस्थितांना संबोधन

► वृत्तसंस्था/ सोमनाथ

पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. रविवारी त्यांनी सोमनाथ येथील ‘स्वाभिमान पर्व’ मध्ये भाग घेतला. शौर्य यात्रेत सहभागी झाल्यानंतर मंदिरात पूजा करून पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. सोमनाथचा इतिहास विनाश आणि पराभवाचा नाही, तर तो विजय आणि पुनर्बांधणीचा आहे. हा आपल्या पूर्वजांच्या शौर्याची, त्यांच्या बलिदानाची आणि समर्पणाची कहाणी आहे. आक्रमणकर्ते येत राहिले, परंतु प्रत्येक युगात सोमनाथची पुनर्स्थापना झाली. इतक्या शतकांचा संघर्ष, इतका मोठा संयम, निर्मिती आणि पुनर्निर्माणाची ही भावना अन्यत्र कुठेही नसून जगाच्या इतिहासात असे उदाहरण शोधणे कठीण असल्याचे सुतोवाच पंतप्रधानांनी केले.

सोमनाथ मंदिरावर 1026 मध्ये झालेल्या पहिल्या हल्ल्याला एक हजार वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त येथे ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ साजरा करण्यात येत आहे. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी संध्याकाळी सोमनाथमध्ये पोहोचले. पंतप्रधानांनी रविवारी सकाळी सुमारे 30 मिनिटे मंदिरात पूजा केली. त्यांनी शिवलिंगावर जलाभिषेक केला, फुले अर्पण केली आणि पंचामृताभिषेकही केला.  सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिर संकुलातून राष्ट्राला संबोधित केले तेव्हा गुजरातमधील पवित्र सोमनाथ मंदिरात श्रद्धा, राष्ट्रीय अभिमान आणि सांस्कृतिक चेतनेचा एक उल्लेखनीय संगम दिसून आला. सोमनाथ मंदिरापासून सुमारे 3 किमी अंतरावर असलेल्या सद्भावना मैदानावर एका सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी या मंदिराची महती अधोरेखित केली. तसेच आपल्याला अजूनही फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्तींपासून सावध राहावे लागेल, असेही ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘जय सोमनाथ’च्या जयघोषाने केल्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाची लाट पसरली. सोमनाथ स्वाभिमान पर्व हे भारतातील लाखो नागरिकांच्या शाश्वत श्रद्धा, भक्ती आणि अढळ संकल्पाचे जिवंत प्रतीक आहे. हा उत्सव केवळ एक कार्यक्रम नाही तर भारताच्या शाश्वत चेतनेचे, सांस्कृतिक वारशाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. औरंगजेबाने सोमनाथ मंदिराचे मशिदीत रुपांतर करण्याचा प्रयत्न केला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली.

एक हजार वर्षांपूर्वी गुजरातमधील सोमनाथ मंदिरावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले, त्या वेळी दहशतवाद्यांना वाटले की ते जिंकले आहेत, परंतु आजही सोमनाथ मंदिरावर फडकणारा ध्वज भारताची ताकद दर्शवितो. दुर्दैवाने, सोमनाथच्या पुनर्बांधणीला विरोध करणाऱ्या शक्ती अजूनही आपल्या देशात अस्तित्वात आहेत. नेहरूंचे नाव न घेता पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा सरदार पटेल यांनी सोमनाथच्या पुनर्बांधणीची शपथ घेतली तेव्हा त्यांना रोखण्याचे प्रयत्न करण्यात आले. 1951 मध्ये मंदिराच्या अभिषेक समारंभात राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या सहभागावर जवाहरलाल नेहरूंनी आक्षेप घेतला होता याची आठवण याप्रसंगी पंतप्रधानांनी करून दिली.

Comments are closed.