सोनम, राज कुशवाह नार्को चाचणी घेणार नाहीत

मेघालय पोलिसांनी फेटाळली राजा रघुवंशीच्या परिवाराची मागणी

वृत्तसंस्था/ शिलाँग

राजा रघुवंशी हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाह यांनी अद्याप पूर्ण सत्य पोलिसांना सांगितलेले नाही. याप्रकरणी राजा रघुवंशीच्या परिवाराने आरोपींची नार्को टेस्ट करविण्यात यावी अशी मागणी केली होती. परंतु मेघालय पोलिसांनी ही मागणी फेटाळत स्थिती पूर्णपणे स्पष्ट केली आहे.

नार्को टेस्ट ही आरोपी तपशील देण्यास नकार देत असेल तरच केली जाते. तर या प्रकरणात आरोपी चौकशीत सहकार्य करत असून पोलिसांकडे त्यांच्या विरोधात ठोस पुरावे आहेत. नार्को टेस्टमध्ये पुरावा काहीही स्वीकारार्ह ठरत नसल्याचे पूर्व खासी हिल्स जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विवेक सिम यांनी म्हटले आहे.

राजा रघुवंशीच्या परिवाराच्या सदस्यांनी सोनम तसेच अन्य आरोपींची नार्को टेस्ट करविण्याची मागणी केली होती. आरोपी कथित स्वरुपात पोलिसांसमोर पूर्ण सत्य कथन करत नसल्याचे परिवाराचे मानणे आहे. सोनम आणि अन्य आरोपी पूर्ण सत्य सांगत नसल्याचे आमचे मानणे आहे. राजाच्या हत्येत आणखी लोक सामील असल्याचा आम्हाला संशय असल्याचे राजाचे ज्येष्ठ बंधू सचिन रघुवंशी यांनी म्हटले आहे. मेघालय पोलिसांनी मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेश पोलिसांसोबत मिळून मागील आठवड्यात राज सिंह कुशवाह, आकाश राजपूत, विशाल सिंह चौहान आणि आनंद कुर्मी यांना अटक केली होती.

मेघालयातील लोकप्रिय पर्यटनस्थळ सोहरा येथे मधुचंद्रासाठी गेलेला नवविवाहित पती राजा रघुवंशीची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी त्याची पत्नी सोनमच मुख्य आरोपी आहे. तिने स्वत:चा प्रियकर कुशवाह आणि अन्य तीन जणांच्या मदतीने ही हत्या घडवून आणली होती. या आरोपींची आता पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Comments are closed.