सोनम वांगचुक यांना केंद्र सरकारकडून चापट मारली

एनजीओची एफसीआरए नोंदणी रद्द

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

केंद्र सरकारने लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या एनजीओची एफसीआरए नोंदणी रद्द केली आहे. त्यांच्या एनजीओंना परकीय निधी नियंत्रित करणाऱ्या कायद्याचे वारंवार उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी वांगचुक यांनी हिंसक निदर्शने केल्यानंतर 24 तासांनी ही नोंदणी रद्द करण्यात आली आहे. परदेशी देणग्या मिळाल्या असूनही संस्थेने योग्य लेखा विवरणपत्रे सादर केली नसल्याचे आढळून आले आहे. आता या प्रकरणात त्यांची ईडीकडूनही चौकशी केली जाऊ शकते.

केंद्रीय गृह मंत्रालयाने सोनम वांगचुक यांच्याशी संबंधित असलेल्या स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाखचा (एसईसीएमओएल) एफसीआरए परवाना रद्द करत त्यांना दणका दिला. सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांसाठी परदेशी देणग्या मिळविण्यासाठी ‘एसईसीएमओएल’ची नोंदणी करण्यात आली होती. वांगचुक यांना 20 ऑगस्ट 2025 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर 10 सप्टेंबर रोजी स्मरणपत्र पाठवण्यात आल्यानंतर संस्थेने 19 सप्टेंबर रोजी प्रतिसाद दिला होता. तथापि, केंद्र सरकारने केलेल्या चौकशीत काही नियमांची ऐसीतैसी होत असल्याचे आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) वांगचुक यांनी स्थापन केलेल्या संस्थांशी संबंधित परदेशी योगदान कायद्याच्या (एफसीआरए) कथित उल्लंघनांची चौकशी सुरू केली होती. सोनम वांगचुक यांनी केलेल्या एफसीआरए उल्लंघनाची चौकशी काही काळापासून प्राथमिक चौकशी म्हणून सुरू होती. परंतु अद्याप या प्रकरणात कोणताही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

Comments are closed.