पाकिस्तानी गुप्तचरांच्या संपर्कात सोनम वांगचुक

लडाखच्या डीजीपींची माहिती : बांगलादेशलाही भेट दिल्याचे स्पष्ट : जोधपूर कारागृहात कैद

वृत्तसंस्था/ लेह

लडाखचे डीजीपी एस. डी. सिंह जामवाल यांनी शनिवारी पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्याबाबत धक्कादायक माहिती उघड केली. वांगचुक हे  पाकिस्तानी गुप्तचर ऑपरेटिव्हच्या (पीआयओ) सदस्याशी संपर्क असल्याचे  जीडीपींनी सांगितले. सदर पीआयओ सदस्याला काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. तो पाकिस्तानला महत्त्वाची माहिती पाठवत असल्यासंबंधीचे ठोस पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवाय, वांगचुक पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि त्यांनी बांगलादेशलाही भेट दिली आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी सध्या सुरू असल्याचे डीजीपींनी सांगितले.

पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना शुक्रवारी दुपारी त्यांच्या गावातून पोलिसांनी अटक केली होती. त्यांना राजस्थानमधील जोधपूर मध्यवर्ती कारागृहात विमानाने नेण्यात आले. वांगचुक यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) आरोप ठेवण्यात आल्यामुळे त्यांना जामीन मिळविणे अवघड होणार आहे. ‘एनएसए’संबंधी आरोपांमुळे त्यांना जामीन मिळणार नसल्याने दीर्घकाळ ताब्यात ठेवून तपास केला जाणार आहे. 24 सप्टेंबर रोजी लेहमध्ये झालेल्या हिंसाचारासाठी सरकारने वांगचुक यांना जबाबदार धरले होते. या हिंसाचारात चार तरुणांचा मृत्यू झाला होता. तसेच 40 पोलिसांसह 80 लोक जखमी झाले होते. या प्रकरणात आतापर्यंत 60 जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या लेहमधील वातावरण शांत होताना दिसत आहे. लेहमध्ये तीन दिवसांच्या संचारबंदीनंतर शनिवारी दुपारी चार तासांसाठी त्यात शिथिलता करण्यात आली आली होती.

वांगचुक यांच्या अटकेमुळे चर्चेच्या फेऱ्यांवर परिणाम

सोनम वांगचुक यांना सरकारच्या संभाव्य अटकेची अपेक्षा होती. फक्त एक दिवस आधी त्यांनी ‘या मुद्यावर अटक झाली तर मला आनंद होईल.’ असे वक्तव्य केले होते. परंतु आता, परिस्थिती शांत होण्याऐवजी, त्यांच्या अटकेमुळे परिस्थिती आणखी चिघळू शकते. याचा परिणाम लडाख प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमधील सुरू असलेल्या चर्चेवर होऊ शकतो. गेल्या पाच वर्षांपासून लडाखच्या हक्कांसाठीच्या लढाईत वांगचुक हे एक प्रमुख व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्या अटकेमुळे जनभावना दुखावल्या गेल्या आहेत. वांगचुक हे हिंसाचाराला चिथावणी देणारे नाहीत, तर ते शांततापूर्ण आंदोलनाचे नेतृत्व करत होते, असे त्यांच्या समर्थकांचे स्पष्ट मत आहे.

Comments are closed.