सोनम वांगचुक रुग्णालयात

दिल्ली पोलिसांची कारवाई, विरोधकांची टीका

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीतील ‘जंतरमंतर’वर गेले तीन आठवडे उपोषण केलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात हलविली आहे. शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या आसपास ही कारवाई करण्यात आली. उपोषणामुळे वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने, दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

3 मे यादिवशी झालेल्या ‘नीट-युजी’ या परीक्षेची प्रश्नप्रत्रिका फुटल्याच्या निषेधार्थ कॉक्रोच जनता पार्टी आंदोलन करीत आहे. दिल्लीच्या जंतरमंतरवर गेले 24 दिवस हे आंदोलन केले जात आहे. याच आंदोलनाचा भाग म्हणून वांगचुक  हे उपोषण करीत आहेत. 20 दिवसाच्या उपोषणानंतर त्यांचे वजन 10 किलो कमी झाले आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात न्यावे लागले. तेथे त्यांच्यावर आवश्यकता निर्माण होईल, त्याप्रमाणे उपचार करण्यात येतील, अशी माहिती आहे.

अशी झाली कारवाई

दिल्ली पोलिसांनी शनिवारी सकाळी सात वाजताच कारवाईला प्रारंभ केला. नागरी वेषभूषेतील अनेक पोलिस आंदोलनस्थळी उपस्थित झाले. त्यांनी वांगचुक उपोषण करीत असलेल्या स्थानाभोवती कडे केले. त्यानंतर पांढऱ्या कापडाने व्यासपीठ झाकण्यात आले. नंतर पोलिसांनी वांगचुक यांना उचलून रुग्णवाहिकेतून दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात आणले. तेथे त्यांना प्रवेश मिळाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीचे परीक्षण करण्यात आले. त्यांची रक्तपरीक्षा आणि इतर चाचण्या करण्यात आल्या. आता सोनम वांगचुक रुग्णालयात विश्रांती घेत असून त्यांचे उपोषण अद्यापही होत आहे, असे प्रतिपादन त्यांच्या पत्नीने पत्रकारांशी बोलताना केले.

उच्च न्यायालयाचा निर्णय

सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीची वारंवार तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. गुरुवारी या याचिकेवर सुनावणी झाली. सोनम वांगचुक यांचा जीव अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे केंद्र       सरकारच्या डॉक्टरांनी त्यांची सातत्याने तपासणी करावी आणि आवश्यकता निर्माण झाल्यास ‘हस्तक्षेप’ करावा, असा आदेश न्यायालयाने दिला.

पोटॅशियमची कमतरता

उपोषणामुळे वांगचुक अशक्त झाले असून त्यांच्या रक्तात पोटॅशियम क्षाराची कमतरता निर्माण झाली आहे. हा घटक मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाचा आहे, असे सफदरजंग रुग्णालयाच्या डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. मात्र, सोनम वांगचुक यांच्या व्यक्तीगत डॉक्टरांनी या अहवालावर संशय व्यक्त केला आहे.

अनुमतीशिवाय उपचार नकोत

वांगचुक यांच्यावर माझ्या अनुमतीशिवाय उपचार केले जाऊ नयेत. त्यांच्या शरीरात काहीही टोचले किंवा सोडले जाऊ नये, अशी मागणी त्यांच्या पत्नीने केली आहे. पत्नी त्यांच्यासह रुग्णालयातच आहे. तथापि, डॉक्टरांचे मत यासंबंधात निर्णायक ठरणार असून रुग्णालय डॉक्टरांच्याच सल्ल्याने पुढची पावले उचलणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. येत्या दोन दिवसांमध्ये निर्णय घेतला जाईल.

विरोधी पक्षांचे समर्थन

वांगचुक यांना रुग्णालयात नेल्यामुळे विरोधी पक्षांनी केंद्र सरकारला दोष दिला. काँग्रेसच्या नेत्यांनी शनिवारी प्रथमच जंतरमंतरवर आंदोलनात प्रवेश केला. केंद्र सरकार शांततेच्या मार्गाने चाललेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, हा प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले. केंद्र सरकार या आंदोलनामुळे हादरले आहे. त्यामुळे त्याने पोलीस बळाचा उपयोग केला, अशी टीकाही काही विरोधी नेत्यांनी केली. तथापि, केंद्र सरकारने हे आरोप फेटाळले असून दिल्ली पोलिसांनी ही कारवाई दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच केली आहे, असे दिल्ली प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दीपके यांची उपोषणाची घोषणा

वांगचुग यांना रुग्णालयात नेऊन केंद्र सरकारने गंभीर चूक केली आहे. आता मी स्वत: आमरण उपोषणाला प्रारंभ करणार आहे, अशी घोषणा कॉक्रोच जनता पक्षाचे नेते अभिजित दीपके यांनी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत आंदोलन चालविले जाईल. तसेच 20 जुलै या दिवशी संसदेवर मोर्चा नेण्याचा कार्यक्रमही केला जाईल. आम्ही केंद्र सरकारच्या दबावतंत्रासमोर झुकणार नाही. आमचे आंदोलन मागणी पूर्ण होईपर्यंत होत राहील. आमचा निर्धार आम्ही कोणालाही संपवू देणार नाही, असे प्रतिपादन अभिजित दीपके यांनी शनिवारी केले आहे.

कारवाईला विरोध

वांगचुक यांना रुग्णालयात नेण्याच्या पोलिसांच्या कृतीला जंतरमंतरवर उपस्थित कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. पोलिसांना व्यासपीठापर्यंत पोहचू दिले जात नव्हते. अडथळे निर्माण केले जात होते. तरीही पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळली. त्यांनी कार्यकर्त्यांशी वाद घातला नाही. शांतपणे आपले उत्तरदायित्व पार पाडले. तसेच आंदोलनकर्त्यांना त्यांनी शांतपणे जंतरमंतर सोडून जा, असे आवाहन केले. तसेच विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनाही त्यांनी शांतपणे हाताळल्याचे दिसले.

मारहाणीचा आरोप

पोलिसांनी आपल्याला मारहाण केली असा आरोप दीपके यांनी केला आहे. आंदोलन बंद करण्याचा पोलिसांनी आदेश दिला. तथापि, आम्ही तो मानण्यास नकार दिल्याने पोलिसांनी मारहाण करत आम्हाला दूर केले, असे दीपके यांचे म्हणणे आहे. तथापि, प्रशासनाने मारहाण केल्याचा आरोप पूर्णत: फेटाळला आहे.

वांगचुक यांची प्रकृती स्थिर

ड सोनम वांगचुक यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून प्रतिपादन

ड रुग्णालयातही वांगचुक उपोषण करीत असल्याचा त्यांच्या पत्नीचा दावा

ड अभिजित दीपके यांच्याकडून आमरण उपोषणाची घोषणा, केंद्रावर टीका

ड विरोधी पक्षांचे वांगचुक यांना समर्थन, आंदोलन दडपल्याचा केला आरोप

Comments are closed.