सोनिया गांधी यांनी लालू प्रसाद यांची भेट घेतली.

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची भेट घेण्यासाठी सोमवारी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या पोहोचल्या. दोन्ही नेत्यांमधील ही भेट लोकसभा खासदार आणि लालूप्रसाद यांच्या कन्या मीसा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी झाली. लालूप्रसादांच्या परिवाराकडून या भेटीला सामान्य ठरविले जात असले तरीही या भेटीमागे अनेक राजकीय अर्थ  देखील काढण्यात येत आहेत. विरोधी पक्षांच्या ‘इंडी“ आघाडीने सध्या निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. अशास्थितीत सोनिया गांधी यांनी लालूप्रसादांची घेतलेली भेट इंडी आघाडीला एकजूट दाखविण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. सोनिया गांधी आणि लालूप्रसाद यांचे राजकीय संबंध अत्यंत दृढ राहिले आहेत. अशास्थितीत काँग्रेसच्या नेतृत्वात निवडणूक आयोगाच्या विरोधात सुरु असलेल्या मोहिमेला आणखी बळ मिळू शकते. लालूप्रसाद हे नियमित वैद्यकीय तपासणीसाठी दिल्लीत आले होते. रविवारी सोनिया गांधी यांच्याशी माझी भेट झाली होती, त्यावेळी मी त्यांना लालूप्रसाद दिल्लीत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर सोनिया गांधींनी लालूप्रसादांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. याचमुळे त्या सोमवारी लालूप्रसादांना भेटल्याचे बिहारमधील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी सांगितले आहे.

गांधी परिवाराशी चांगले संबंध

लालूप्रसाद यादव आणि सोनिया गांधी यांच्यात नेहमीच चांगले राजकीय संबंध राहिले आहेत. संकटसमयी देखील त्यांनी परस्परांसोबत उभे राहत समर्थन केले आहे. आमचा परिवार आणि गांधी परिवारादरम्यान दीर्घकाळापासून उत्तम संबंध आहेत. सोमवारच्या भेटीचा उद्देश लालूप्रसादांच्या आरोग्याविषयी विचारपूस करणे होता असे तेजस्वी यादव म्हणाले.

Comments are closed.