सोनिया गांधींनी महान निकोबार प्रकल्पाला विरोध केला
आदिवासींच्या अस्तित्वासाठी धोकादायक असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी ग्रेट निकोबार प्रकल्पाला एक ‘सुनियोजित दुस्साहस’ ठरविले आहे. हा प्रकल्प बेटावरील आदिवासी समुदायांच्या अस्तित्वाला धोक्यात आणणारा आहे, तसेच तो असंवेदनशील पद्धतीने रेटला जात आहे. हा प्रकल्प लागू करताना ‘सर्व कायदेशीर आणि विचारविनिमय प्रक्रियां’चा उपहास करण्यात येत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला आहे.
शोम्पेन आणि निकोबारी समुदायांचे अस्तित्वच पणाला लागले असताना सामूहिक चेतना गप्प राहू शकत नाही. भविष्यातील पिढ्यांबद्दल आमची प्रतिबद्धता एक अत्यंत विशिष्ट पर्यावरणीय व्यवस्थेचे इतक्या मोठ्या प्रमाणावरील विनाशाची अनुमती देऊ शकत नाही. न्यायाचा हा उपहास आणि आमच्या राष्ट्रीय मूल्यांसोबत या विश्वासघाताच्या विरोधात आम्ही आवाज उठवायला हवा असे सोनिया गांधी यांनी एका लेखाद्वारे म्हटले आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडून आदिवासी विषयक मंत्री जुएल ओराम यांना पत्र लिहिण्यात आल्याच्या काही दिवसांनी सोनिया गांधी यांनी हा लेख लिहिला आहे. ग्रेट निकोबार प्रकल्पाला मंजुरी देताना वन अधिकार अधिनियमाच्या कथित उल्लंघनावर राहुल गांधी यांनी चिंता व्यक्त केली होती तसेच सरकारला कायद्यानुसार निर्धारित प्रक्रियेचे पालन सुनिश्चित करण्याचा आग्रह केला होता.
मागील 11 वर्षांच्या मोदी सरकारच्या कार्यकाळादरम्यान ‘अर्धवट आणि विचार न करता धोरण निर्मिती’ची कुठलीच कमतरता राहिलेली नाही. योजनाबद्ध चुकीच्या प्रयत्नांच्या या साखळीत ग्रेट निकोबार मेगा-इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प सामील झाला आहे. 72 हजार कोटींचा हा प्रकल्प बेटावरील आदिवासी समुदायांच्या अस्तित्वासाठी धोका निर्माण करतो. तसेच या प्रकल्पामुळे जगातील सर्वात अनोख्या वनस्पती आणि जीवांच्या पर्यावरणी व्यवस्थेचे नुकसान होणार आहे. याचबरोबर संबंधित क्षेत्र नैसर्गिक आपत्तींसाठी अत्याधिक संवेदनशील असल्याचा दावा सोनया गांधी यांनी केला आहे.
प्रकल्प सुरू करण्यापूर्वी सरकारने ग्रेट निकोबार आणि लिटिल निकोबार बेटसमूहाच्या आदिवासी परिषदेशी सल्लामसलत करणे आवश्यक होते. तर याऐवजी परिषदेच्या अध्यक्षाच्या आवाहनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा दावा सोनिया गांधी यांनी केला. ग्रेट निकोबारचा समग्र विकास नावाच्या या प्रकल्पात एक ट्रान्सशिपमेंट पोर्ट, एक आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच वसाहत आणि 160 चौरस किलोमीटरपेक्षा अधिक क्षेत्रात फैलावलेल्या एक वीज प्रकल्पाची निर्मिती सामील आहे.
Comments are closed.