सोनिया गांधींना रुग्णालयात उपचार सुरू आहेत
अचानक बिघडली होती प्रकृती : सर गंगाराम रुग्णालयात दाखल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसच्या संसदीय गटाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना रविवारी रात्री पोटासंबंधी समस्येमुळे सर गंगाराम रुग्णालयाच्या गॅस्ट्रोएंट्रोलॉजी विभागात दाखल करण्यात आले. सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्या आरोग्यस्थितीवर नजर ठेवून असल्याची माहिती रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरुप यांनी दिली आहे.
सोनिया गांधी यांना पोटाशी संबंधित समस्येमुळे तातडीने भरती करण्यात आले होते. रुग्णालय कर्मचारी आणि डॉक्टर्सच्या टीमने त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू केल्याचे डॉ. स्वरुप यांनी सांगितले आहे. सोनिया गांधी यांनी 1997 मध्ये काँग्रेसचे सदस्यत्व ग्रहण केले होते आणि केवळ एक वर्षानंतर 1998 मध्ये त्या पक्षाच्या अध्यक्ष झाल्या होत्या. त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने दोनवेळा 2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत यश मिळवित संपुआ सरकार स्थापन केले होते. परंतु त्यांनी स्वत: पंतप्रधान होण्याचा प्रस्ताव नाकारला होता आणि डॉ. मनमोहन सिंह यांना पंतप्रधान म्हणून निवडले होते.
2017 मध्ये सोनिया गांधींनी काँग्रेस अध्यक्षपद सोडत पक्षाची धुरा राहुल गांधींकडे सोपविली होती. परंतु 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील पराभव आणि राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर सोनिया गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाच्या अंतरिम अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
Comments are closed.