सौरव गांगुली यांना उच्च न्यायालयाचा धक्का! या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची केली होती मागणी

भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian cricket team) सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेले सौरव गांगुली (Saurav Ganguly) सध्या चर्चेत आहेत. मात्र, हे प्रकरण क्रिकेटशी संबंधित नाही. तर, दिल्ली उच्च न्यायालयाने सौरव गांगुली यांना धक्का दिला आहे. गांगुली यांनी ‘दुसरा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. मात्र, न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली आहे. हा चित्रपट 23 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

न्यायमूर्ती दिनेश भट्ट यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने तोंडी निरीक्षण नोंदवताना म्हटले की, या प्रकरणात ‘सोयीचा समतोल’ हा चित्रपटाच्या निर्मात्यांच्या बाजूने आहे.

न्यायालयाकडून एखाद्या गोष्टीवर तात्पुरती बंदी घालायची की नाही, हे ठरवताना या कायदेशीर तत्त्वाचा वापर केला जातो. बंदी न घातल्यास याचिकाकर्त्याचे किती नुकसान होऊ शकते आणि बंदी घातल्यास विरोधी पक्षाचे किती नुकसान होऊ शकते, याचा न्यायालय विचार करते.

न्यायमूर्ती भट्ट यांनी गांगुली यांच्या वकिलांना सांगितले, हा चित्रपट उद्या (शुक्रवारी) प्रदर्शित होणार आहे. प्रथमदर्शनी, ‘सोयीचा समतोल’ तुमच्या बाजूने दिसत नाही. तुमच्याकडे काही महत्त्वाचे अधिकार असू शकतात, मात्र आज आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती देत नाही. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी ठेवली आहे.

सौरव गांगुली यांच्यासोबतच त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची निर्मिती करणारी ‘लव्ह फिल्म्स एलएलपी’ ही कंपनीदेखील या खटल्यात याचिकाकर्ता आहे.

‘दुसरा’ चित्रपटाच्या निर्मात्यांच्या वतीने न्यायालयात उपस्थित असलेल्या ज्येष्ठ वकिलांनी हा चित्रपट बायोपिक नसल्याचे स्पष्ट केले. तसेच, चित्रपटात याचिकाकर्त्यांशी संबंधित काही व्हिडिओ क्लिप वापरण्यासाठी आवश्यक परवानग्या घेतल्याचेही त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, सौरव गांगुली यांच्या वकिलांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी संबंधित अधिकारांचे उल्लंघन होण्याची शक्यता व्यक्त केली. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी गांगुली यांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. गांगुली यांच्या जीवनावर आधारित एक बायोपिक आधीपासूनच तयार होत असल्याची माहितीही न्यायालयात देण्यात आली.

दरम्यान, ‘दुसरा’ हा चित्रपट राजस्थानमधील एका मध्यमवर्गीय मुलीची कथा सांगतो. भारतीय संघाच्या माजी कर्णधाराशी संबंधित काही क्रिकेट स्पर्धांपासून प्रेरणा घेऊन ही मुलगी क्रिकेटच्या जगात प्रवेश करते, असे सांगितले जात आहे.

Comments are closed.