सीएसकेकडून सौरव गांगुलीच्या टीमचा पराभव, मार्को यानसेनच्या भावाने केली जोरदार फटकेबाजी!
SA20 लीगमध्ये प्रशिक्षक म्हणून सौरव गांगुलींच्या कारकिर्दीची सुरुवात पराभवाने झाली आहे. त्यांच्या प्रिटोरिया कॅपिटल्स संघाला जोबर्ग सुपर किंग्सकडून 22 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. (27 डिसेंबर) रोजी खेळल्या गेलेल्या या सामन्यात जोबर्ग सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांत 168 धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात कॅपिटल्सचा संघ केवळ 146 धावाच करू शकला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू मार्को यानसेनचा भाऊ डुआन यानसेन याने घातक गोलंदाजी करत 4 बळी घेतले.
सौरव गांगुली प्रिटोरिया कॅपिटल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक असून प्रशिक्षक म्हणून त्यांचा हा पहिलाच हंगाम आहे, मात्र त्यांच्या संघाला पहिल्याच सामन्यात हार मानावी लागली. कॅपिटल्ससाठी सलामीवीर विल स्मीड (34 धावा) आणि ब्राइस पारसन्स (41 धावा) यांच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. एकेकाळी बिनबाद 71 धावा अशा सुस्थितीत असलेल्या कॅपिटल्सने पुढच्या 71 धावांत आपले 9 फलंदाज गमावले. जोबर्ग सुपर किंग्ससाठी डुआन यानसेनने 4 षटकांत 23 धावा देऊन 4 बळी घेतले, तर वियान मुल्डरने 4 षटकांत 22 धावा देत एक बळी मिळवून धावांच्या गतीवर अंकुश ठेवला.
या सामन्यात अनेक मोठे खेळाडू अपयशी ठरले. जोबर्ग सुपर किंग्सचा कर्णधार फाफ डू प्लेसिस केवळ 2 धावांवर बाद झाला, तर वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने 10 पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. याशिवाय शाय होप आणि डेवाल्ड ब्रेविस यांनाही विशेष कामगिरी करता आली नाही. SA20 2025 हंगामाची सुरुवात 26 डिसेंबरपासून झाली असून याचा अंतिम सामना 25 जानेवारीला होईल. या लीगमध्ये 6 संघ सहभागी असून या सर्वांची मालकी आयपीएल (IPL) फ्रँचायझींकडे आहे, ज्यामध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनऊ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या संघांचा समावेश आहे.
Comments are closed.