T20 WC26: न्यूझीलंडविरुद्ध क्विंटन डी कॉकच्या एका चूकीमुळे दक्षिण आफ्रिका स्पर्धेबाहेर! झाला पुन्हा स्वप्नभंग

आयसीसी स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेची निराशा झाली आहे. सुरू असलेल्या पुरुष आयसीसी टी२० विश्वचषकात बुधवारी (४ मार्च) दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड असा पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. त्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा विकेटकिपर क्विंटन डी कॉकच्या एका चुकीमुळे संघाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याची ती चूक सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला.

हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर खेळला गेला. हा सामना न्यूझीलंडने ९ विकेट्सने जिंकला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. या सामन्यात क्विंटनने केलेली एक चूक आणि संघाचा अंतिम फेरीत जाण्याचा स्वप्नभंग झाला. त्याने ती चूक केली नसती तर सामन्याचा निकाल काही वेगळाच लागला असता.

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सॅंटनरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी निराशा केली. केवळ मार्को जॅनसेनने नाबाद ५५ धावा केल्या. डेवाल्ड ब्रेविसच्या ३४ धावा आणि ट्रिस्टन स्टब्सने २९ धावा केल्याने दक्षिण आफ्रिकेने २० षटकात ८ विकेट्स गमावत १६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने आक्रमक सुरूवात केली. त्यांचे सलामीवीर फिन ऍलन आणि टीम सेफर्ट यांनी पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली. ज्यामुळे हा सामना न्यूझीलंडने १२.५ षटकातच एक विकेट गमावत जिंकला. या सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेला ती भागीदारी रोखण्याची संधी मिळाली होती.

न्यूझीलंडच्या फलंदाजीवेळी दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कगिसो रबाडाने सेफर्टला बाद करण्याची संधी निर्माण केली होती. तो चेंडू सेफर्टच्या बॅटची कड घेऊन हवेत गेला आणि तो झेल घेण्याची संधी क्विंटनने सोडली. त्याने स्वत:च तो कॅच पकडण्याचा कॉल दिला होता, मात्र जेव्हा चेंडू हवेत गेला तेव्हा तो वेळेत तेथे पोहोचला नाही. येथे क्विंटन आणि ब्रेविसमध्ये गोंधळ निर्माण झालेला दिसला.

उपांत्य फेरीसारख्या महत्वाच्या सामन्यात अशी चूक करणे किती महागात पडू शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तसेच इंग्रजीत एक म्हण आहे कॅचेस विन मॅचेस. जर क्विंटनने तो झेल पकडला असता तर कदाचित सामन्याचा निकाल काही वेगळाच असता. तेथे त्याने कॉल नसता दिला असता तर ब्रेविससाठी तो झेल घेण्याची सोपी संधी होती.

या सामन्यात सेफर्टने अर्धशतकी खेळी केली. त्याने ३३ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने ५८ धावा केल्या. त्याला रबाडानेच बोल्ड केले. तसेच ऍलनने ३३ चेंडूत नाबाद १०० धावा करत संघाच्या विजयात मोलाची भुमिका पार पाडली.

Comments are closed.