दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ खेळाडूने निवृत्तीचा निर्णय घेतला मागे! पुन्हा खेळणार आंतरराष्ट्रीय क्रिकेट

32 वर्षांचा विकेटकीपर फलंदाज क्विंटन डिकॉकने (Quienten De cock) वनडे आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतलेला निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. डिकॉकने 2023 च्या वनडे वर्ल्डकपनंतर वनडे क्रिकेटला आणि 2024 च्या टी20 वर्ल्डकपनंतर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र आता त्याने या निर्णयावर यू-टर्न घेतला असून तो पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेसाठी वनडे आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना दिसणार आहे. पण तो कसोटीतून घेतलेली निवृत्ती मात्र मागे घेत नाही.

डिकॉकने सीमित षटकांच्या स्वरूपातील शेवटचा सामना 2024 मध्ये बारबाडोसमध्ये झालेल्या टी20 वर्ल्डकपमध्ये खेळला होता. या डावखुऱ्या सलामीवीराने 2023 च्या वर्ल्डकपनंतर वनडे क्रिकेटला रामराम केला होता. त्यानंतर त्यावेळचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी त्याला टी20 संघात घेतले नव्हते, कारण त्याच्या भविष्यासंदर्भात त्यांना शंका होती.

आता क्विंटन डिकॉकला दक्षिण आफ्रिकेच्या टी20 आणि वनडे संघात स्थान मिळाले आहे. दक्षिण आफ्रिकेचे सध्याचे मुख्य प्रशिक्षक शकुरी कॉनराड यांनी त्याच्याशी चर्चा करून त्याला दोन्ही संघात संधी दिली आहे.
कॉनराड म्हणाले, डिकॉकचे सीमित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन आमच्यासाठी मनोबल वाढवणारे आहे. मागच्या महिन्यात जेव्हा त्याच्याशी भविष्यासंबंधी चर्चा झाली, तेव्हा स्पष्ट झाले की त्याच्यात अजूनही देशासाठी खेळण्याची तीव्र इच्छा आहे. तो संघात कोणत्या दर्जाची गुणवत्ता आणतो हे सगळ्यांनाच ठाऊक आहे आणि त्याचे पुनरागमन संघासाठी फायद्याचेच ठरेल.

डिकॉकने आतापर्यंत 155 वनडे सामन्यांमध्ये 45.74 च्या सरासरीने आणि 96.64 च्या स्ट्राइक रेटने 6770 धावा केल्या आहेत. त्याची पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड झाली आहे. तसेच तो टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेसाठीही निवडला गेला आहे. 92 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने 2584 धावा केल्या आहेत.

Comments are closed.