आता सोयाबीन खरेदीवर प्रशासनाची करडी नजर; तपासणीसाठी पथके गठीत, मुदतवाढ दिल्यानंतर प्रशासन सतर्क
सोयाबीन: सरकारनं हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याच्या मुदतीत वाढ केली आहे. आता 6 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीनची खरेदी करता येणार आहे. यानंतर प्रशासन सतर्क झालं आहे. आता हमीभावानं सोयाबीन खरेदीवर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. यासाठी लातूर जिल्ह्यात तपासणीसाठी तालुकास्तरीय पथके गठीत करण्यात आली आहेत.
सोयाबीन खरेदीमध्ये अनियमितता होवू नये यासाठी प्रशासन सतर्क
लातूर जिल्ह्यात सुरु असलेल्या हमीभावाने सोयाबीन खरेदी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी तालुकास्तरीय पथके गठीत करण्यात आली आहेत. याबाबतचे आदेश लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज निर्गमित केले आहेत. ही पथके दररोज अचानकपणे प्रत्येक खरेदी केंद्रावर चार वेळा भेट देवून तेथील सोयाबीन खरेदी प्रक्रियेची तपासणी करणार आहेत. राज्य शासनाने सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली असून, या काळात सोयाबीन खरेदीमध्ये अनियमितता होवू नये, नोंदणीकृत शेतकऱ्यांचे सोयाबीनच खरेदी केली जाईल, यासाठी तालुकास्तरीय पथके उपाययोजना करणार आहेत.
लातूर जिल्ह्यात 52 खरेदी केंद्रांच्या माध्यमातून हमीभावाने सोयाबीन खरेदी
दरम्यान, याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना या पथकांना करण्यात आल्या आहेत. लातूर जिल्ह्यात सध्या विविध 52 खरेदी केंद्रांच्या माध्यमातून हमीभावाने सोयाबीन खरेदी केली जात आहे.
राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू असून 31 जानेवारी नंतर सोयाबीनची (Soyabin) खरेदी पुढे काही दिवस चालू राहावी, अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला आम्ही प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मान्य केला असून सोयाबीन खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे, अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. त्यामुळे, राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आत्तापर्यंत सोयाबीनची किती खरेदी?
सोयाबीन खरेदीची मुदत वाढावी अशी राज्यातील लोक प्रतिनिधी व शेतकऱ्यांची मागणी होती,ही मागणी लक्षात घेता यासाठी आमचा प्रत्यक्ष पाठपुरावा सुरू होता.आज ती मुदतवाढ मिळाली. या मुदतवाढीमुळे राज्याला दिलेल्या 14,13,269 मेट्रिक टन पी पी एस खरेदी उद्दिष्ट्याला पूर्ण करता येणार असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ च्या माध्यमातून 562 खरेदी केंद्रावर 30 जानेवारीपर्यंत 4 लाख 37 हजार 495 शेतकऱ्यांकडून 9 लाख 42 हजार 397 मेट्रिक टना पेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी झालेली आहे.
अधिक पाहा..
Comments are closed.