एसपी नेते आझम खान 23 महिन्यांनंतर तुरूंगातून बाहेर

वृत्तसंस्था/ सीतापूर, रामपूर

सपा नेते आझम खान मंगळवारी दुपारी तब्बल 23 महिन्यांनी सीतापूर तुरुंगातून बाहेर पडले. पाच दिवसांपूर्वी उच्च न्यायालयाने आझम खान यांना बिअर बार ताब्यात घेण्याशी संबंधित प्रकरणात जामीन मंजूर केला होता. त्यानंतर 20 सप्टेंबर रोजी रामपूर न्यायालयाने त्यांच्याविरोधातील कलमे रद्द करून त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता. आझम खान यांच्यावर 104 गुन्हे दाखल आहेत.

आझम खान यांची सकाळी 9 वाजता सुटका होणार होती, परंतु एका प्रकरणात 6,000 रुपयांचा दंड भरण्यात आला नसल्यामुळे सकाळी 10 वाजता न्यायालय उघडल्यावर ही रक्कम जमा केल्यानंतर दुपारी 12:30 वाजता त्यांची सुटका करण्यात आली. काळा गॉगल आणि पांढरा कुर्ता घातलेल्या आझम खान यांनी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर आपल्या समर्थकांना हात उंचावून अभिवादन केले.  जामीन मिळाल्यानंतर त्यांना कारागृहातून घरी नेण्यासाठी अदीब आणि अब्दुल्लाह हे दोन्ही मुलगे आले होते. यावेळी त्यांच्यासमवेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि वाहनताफाही होता. मुरादाबादच्या खासदार रुची वीरा आणि 400 हून अधिक कार्यकर्ते त्यांचे स्वागत करण्यासाठी तेथे उपस्थित होते. कारागृहातून सुटका झाल्यानंतर ते 100 वाहनांच्या ताफ्यासह रामपूरला निघाले.

सुटकेनंतर आझम खान यांना बसपामध्ये सामील होण्याबाबत विचारले असता ‘अडचणी लावणारेच याबाबत सांगू शकतात. मी तुरुंगात कोणालाही भेटलो नाही. मला फोन करण्याचीही परवानगी नव्हती,’ असे सांगितले. तर अखिलेश यादव यांनी सपा सरकार स्थापन होताच आझम खान यांच्यावरील सर्व खटले रद्द केले जातील असे स्पष्ट केले आहे.

Comments are closed.