सपा आमदाराची भाजपवर वादग्रस्त टिप्पणी

वृत्तसंस्था/ लखनौ

समाजवादी पक्षाचे आमदार सुरेश यादव यांनी वादग्रस्त टिप्पणी केली आहे. बाराबंकी येथे आयोजित एका सभेत बोलताना त्यांनी भाजप सरकारला ‘हिंदू दहशतवादी संघटना’ संबोधिले आहे. हे भाजप सरकार असून हिंदू दहशतवादी संघटना आहे, जे देशाची राज्यघटना आणि लोकशाही मूल्यांना कमकुवत करू पाहत असून समाजवादी पक्ष हे कदापिही सहन करणार नसल्याचा दावा यादव  यांनी केला होता.

यादव यांच्या या टिप्पणीला भाजप नेत्याने घटनाविरोधी ठरवत समाजवादी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. सप नेत्यांची अशाप्रकारची वक्तव्यं ही त्यांची हताशा दर्शविते. तसेच अशाप्रकारची वक्तव्यं ही पक्षाच्या अंतर्गत संघर्षाचा संकेत देणारी असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.

सुरेश यादव हे उत्तरप्रदेशच्या बाराबंकी जिल्ह्यातील सदर मतदारसंघाचे आमदार आहेत. सुरेश यादव यांना सप प्रमुख अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाते. परंतु यादव यांच्या या टिप्पणीमुळे समाजवादी पक्षाच्या अडचणी वाढणार आहेत.

Comments are closed.