FIFA WC 2026: फ्रान्सचं स्वप्न भंगलं! स्पेनने 2-0 ने पराभूत करत फायनलचं तिकीट पक्कं केलं
फिफा विश्वचषक 2026च्या FIFA World Cup 2026 पहिल्या रोमांचक उपांत्य सामन्यात स्पेनने फ्रान्सचा Spain VS France 2-0 असा पराभव केला. या विजयासह, स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारा पहिला संघ ठरण्याचा मान स्पेनने मिळवला. दुसरीकडे, किलियन एमबाप्पेसारखा स्टार खेळाडू संघात असूनही, फ्रान्सला सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचता आले नाही. स्पेनच्या भक्कम बचावफळीसमोर फ्रान्सची आक्रमक फळी पूर्णपणे निष्प्रभ ठरली. 2010चे विश्वचषक विजेते असलेल्या स्पेनने पुन्हा एकदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे.
मंगळवारी झालेल्या उपांत्य सामन्यात मिकेल ओयारझाबल आणि पेड्रो पोरो यांनी प्रत्येकी एक गोल करत स्पेनच्या 2-0 विजयावर शिक्कामोर्तब केले. या स्पर्धेतील सात सामन्यांपैकी सहा सामन्यांत स्पेनने प्रतिस्पर्ध्यांना गोल करण्यापासून रोखले आहे, ज्यावरून त्यांच्या बचावफळीची ताकद पुन्हा एकदा दिसून आली.
सामन्यापूर्वी युवा स्टार लॅमिन Lamine Yamal यामलने म्हटले होते की, “फ्रान्सने स्पेनची भीती बाळगली पाहिजे.” त्याचे हे शब्द मैदानात खरे ठरले. फिफा क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या फ्रान्सचे नेतृत्व Kylian Mbappe किलियन एमबाप्पे करत होता. उपांत्य सामन्यापूर्वी, एमबाप्पेने 20 विश्वचषक सामन्यांमध्ये 20 गोल केले होते. त्याच्यासोबत ‘बॅलन डी’ओर’ विजेता उस्मान डेम्बेले आणि मायकल ओलिसे हे खेळाडू होते. मात्र, स्पेनच्या अभेद्य बचावफळीसमोर या त्रिकुटाचा प्रभाव पडला नाही.
सामन्याच्या 22व्या मिनिटाला, लॅमिन यामलच्या उत्कृष्ट चालीनंतर फ्रान्सचा बचावपटू लुकास डिग्ने याने ‘फाऊल’ केला. मिळालेल्या पेनल्टीवर मिकेल ओयारझाबलने अचूक गोल करत स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर, 58 व्या मिनिटाला डॅनी ओल्मोसोबतच्या उत्कृष्ट समन्वयानंतर पेड्रो पोरोने दुसरा गोल केला आणि स्पेनचा विजय जवळपास निश्चित केला.
आता फिफा विश्वचषक 2026च्या अंतिम फेरीत स्पेनचा सामना दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्याशी म्हणजेच गतविजेता अर्जेंटिना किंवा इंग्लंड यांच्यापैकी एकाशी होईल. अंतिम सामना रविवारी ईस्ट रदरफोर्ड, न्यू जर्सी येथे खेळवला जाईल.
Comments are closed.