७४ लाख ठाणेकर मतदानासाठी पात्र आहेत काय? आजपासून झाडाझडती; जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रात विशेष मोहीम

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

७४ लाख ठाणेकर मतदानासाठी पात्र आहेत काय, याची झाडाझडती उद्या मंगळवारपासून करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा क्षेत्रात त्यासाठी मोहीम राबवण्यात येत असून बीएलओ घरोघरी जाणार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) हाती घेतले असून त्यात संबंधित मतदाराचे नाव, वय, दुबार नोंदी, पत्ता आदी आवश्यक असलेली माहिती तपासण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील एकूण ७४ लाख ५० हजार ५१५ मतदारांची पात्रता या मोहिमेमुळे निश्चित होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघाचे मतदार एकूण ६ हजार ८९४ मतदान केंद्रांशी जोडले गेले आहेत. ऐन निवडणुकीच्या वेळी अनेकदा मतदाराला आपले नावच यादीत नसल्याचे दिसून येते. तर काही मतदारांच्या नावामध्ये चुका आढळतात. अनेकांचे पत्तेही चुकीच्या पद्धतीने असतात. दुबार मतदारांच्या बाबतीत तर प्रत्येक वेळी गोंधळ उडतो. पुढील निवडणुकीच्या वेळी अशा प्रकारचा गोंधळ होऊ नये आणि मतदार याद्या शंभर टक्के अचूक असाव्यात याकरिता ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित अधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली. त्यात या मोहिमेबाबत सखोल चर्चा व माहिती देण्यात आली.

२९ जुलैपर्यंत मोहीम चालणार
३० जून ते २९ जुलै या कालावधीत ही मोहीम चालणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र भरून घेतील. यामध्ये नाव, लिंग, वय, नातेसंबंध, मोठ्या संख्येने वंशज जोडणी असल्यास, पालकांच्या तपसिलातील तफावत आणि जुळवणी न झालेले मतदार यांच्या माहितीचे वर्गीकरण व चिन्हांकन केले जाईल.

नेमके काय करणार

  • ज्यांचा जन्म हिंदुस्थानात १ जुलै १९८७ पूर्वी झाला असेल त्यांना पुरावा सिद्ध कराना लागेल. स्वतःची जन्म तारीख किंवा जन्मस्थळ नमूद केलेला कोणताही एक वैध दस्तऐवज ग्राह्य भरवण्यात येईल
  • जन्म १ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४ या कालावधीत झाला असल्यास आई किंवा वडील यांच्यापैकी कुणाचाही जन्माचा पुरावा जोडावा लागेल.
  • २ डिसेंबर २००४ नंतर हिंदुस्थानात जन्म झालेल्यांच्या पालकांपैकी कुणी हिंदुस्थानी नागरिक नसल्यास अर्जदाराच्या जन्माच्या वेळचा त्यांचा वैध पासपोर्ट आणि व्हिसाची प्रत सादर करावी लागेल.
  • देशाबाहेर जन्म झालेल्यांसाठी परदेशातील हिंदुस्थानी दूतावासाने जारी केलेला जन्मनोंदणीचा पुरावा आणि नागरिकत्व नोंदणी प्रमाणपत्र घोषणापत्रासोबत सादर करणे बंधनकारक आहे.

Comments are closed.