कोनेरू हम्पी-दिव्या देशमुखचा सलग दुसरा डाव बरोबरीत, टायब्रेकवर ठरणार ‘विजेता’, जाणून घ्या काय आ

कोनेरू हम्पी वि दिव्य देशमुख वुमेन्स बुद्धिबळ विश्वचषक अंतिम 2025: जॉर्जिया देशातील बटुमी शहरात सुरू असलेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेची अंतिम फेरी सध्या रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. या अंतिम फेरीत भारताच्या ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी आणि युवा प्रतिभावान खेळाडू दिव्या देशमुख यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे.

शनिवार, 26 जुलै रोजी अंतिम फेरीतील पहिला डाव खेळवण्यात आला, जो 41 चालींनंतर अनिर्णित राहिला. त्यानंतर रविवारी, 27 जुलै रोजी दुसऱ्या डावातही कोणतीही खेळाडू निर्णायक विजय मिळवू शकली नाही आणि तो सामना देखील बरोबरीतच सुटला. आता या दोघींमधील अंतिम निर्णय सोमवारी होणाऱ्या टायब्रेक सामन्यात लागणार आहे.

दुसऱ्या डावात काय घडलं?

पहिल्या डावामध्ये थोडक्याच अंतराने पराभव टाळल्यामुळे हम्पीकडे मानसिक आघाडी होती. विशेष म्हणजे या स्पर्धेत हम्पीने आजवर पांढऱ्या सोंगट्यांमध्ये खेळलेला एकही सामना तिने गमावलेला नाही. आजच्या दुसऱ्या डावामध्ये हम्पीने थोडी आश्चर्यचकित करणारी सुरुवात केली. तिने रेती ओपनिंग (Reti Opening) खेळली, दिव्याने यावर ‘अ‍ॅजिनकोर्ट डिफेन्स’चा पर्याय निवडला.

सुरुवातीचे डाव समसमान झाले आणि विशेष जोखीम दिसून आली नाही. मात्र 21व्या चालीनंतर परिस्थिती थोडी बदलू लागली, जेव्हा दोघींनी जवळपास 15-15 मिनिटे विचार करून पुढची चाल खेळली. त्यानंतर 24व्या चालीत दिव्याने सुमारे 19 मिनिटांचा विचार केल्याने ती थोड्या दबावात आली.

ज्यामुळे हम्पीला थोडीशी संधी मिळाली होती, पण हम्पी संधीचं सोनं करू शकली नाही. दिव्याच्या अचूक आणि सावध चालींमुळे हम्पीला अधिक आक्रमकता दाखवता आली नाही. दोघींनीही 34 व्या चालीनंतर तीन वेळा पुनरावृत्ती झाल्यामुळे सामना बरोबरीत सुटला.

काय आहेत टायब्रेकचे नियम?

आता सगळ्यांच्या नजरा सोमवारच्या टायब्रेक्सकडे लागल्या आहेत, जेव्हा ही दोन प्रतिभावान भारतीय खेळाडू वर्ल्ड कप विजेतेपदासाठी निर्णायक झुंज देतील. पहिल्या रॅपिड डावात हम्पी काळ्या सोंगट्यांनं खेळणार आहे.

  • पहिल्यांदा दोन रॅपिड डाव, प्रत्येकी 10 मिनिटांचा वेळ आणि प्रत्येक चालीनंतर 10 सेकंद वाढ.
  • जर अजूनही सामना बरोबरीत राहिला, तर दोन अतिरिक्त रॅपिड डाव, प्रत्येकी 5 मिनिटांचा वेळ आणि प्रत्येक चालीनंतर 3 सेकंद वाढ.
  • तरीही निर्णय लागला नाही, तर दोन ब्लिट्झ डाव, प्रत्येकी 3 मिनिटांचा वेळ आणि प्रत्येक चालीनंतर 2 सेकंद वाढ.
  • जर हे सगळंही अनिर्णित राहिलं, तर 3+2 (3 मिनिटे + 2 सेकंद वाढ) या वेळेत ब्लिट्झ डाव चालू ठेवले जातील, जोपर्यंत विजेता ठरत नाही.

आणखी वाचा

Comments are closed.