श्रीलंकेची मानहानी टळली, पण पराभव अटळ; पसींदू सोरियाबंडाराचे शतक हुकले हिंदुस्थानच्या मालिका विजयावर आज शिक्का

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

फॉलोऑननंतर श्रीलंकेने हिंदुस्थानच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र अखेर मानव सुथारच्या फिरकीने श्रीलंकेच्या प्रतिकाराला खिंडार पाडले. चौथ्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा श्रीलंकेने दुसऱ्या डावात 6 बाद 229 धावा केल्या असून टीम इंडियाच्या पहिल्या डावातील 503 धावांच्या तुलनेत श्रीलंकेकडे अवघी 16 धावांची आघाडी आहे. पावसामुळे दिवसाचा खेळ वेळेपूर्वीच थांबवावा लागला. पसींदू सोरियाबंडाराने हिंदुस्थानी गोलंदाजीचा प्रतिकार करीत श्रीलंकेवरील डावाने पराभवाची नामुष्की टाळण्यात यश मिळविले. मात्र, त्याच्यासह कामिंदू मेडिंस (55) व कर्णधार धनंजया डी’सिल्वा (23) या मधल्या फळीतील फलंदाजही बाद झाल्याने आता श्रीलंकेचा पराभव अटळ आहे. पावसामुळे बराच खेळ वाया गेल्याने हिंदुस्थानचा कसोटी आणि मालिका विजय गुरुवारपर्यंत लांबला आहे.

दिनुशाचे सलग दुसरे शतक

श्रीलंकेने तिसऱया दिवसाच्या 8 बाद 265 धावसंख्येवरून बुधवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. मंगळवारी 65 धावांवर नाबाद परतलेल्या सोनल दिनुशाने 103 धावांची झुंजार खेळी करीत सलग दुसरे कसोटी शतक झळकवण्याचा पराक्रम केला. मात्र, शतकानंतर तो फार काळ टिकू शकला नाही. सारांश जैनने त्याला स्लिपमध्ये लोकेश राहुलकरवी झेलबाद करून श्रीलंकेचा डाव संपविला.

श्रीलंकेवर फॉलोऑन; पसींदूची झुंजार फलंदाजी

9 बाद 503 धावांवर डाव घोषित करणाऱया हिंदुस्थानने श्रीलंकेला 89.4 षटकांत 290 धावांवर संपवून पहिल्या डावात 213 धावांची आघाडी घेत यजमानांवर फॉलोऑन लादण्याचा निर्णय घेतला. दुसऱया डावात श्रीलंकेची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. मात्र, दुसऱयाच कसोटी सामन्यात खेळणाऱ्या पसींदू सोरियाबंडाराने हिंदुस्थानी गोलंदाजांचा नेटाने सामना केला. त्याने कामिल मिशारासोबत (32) दुसऱ्या विकेटसाठी 58, तर कामिंदू मेंडिससोबत (55) तिसऱया विकेटसाठी तब्बल 115 धावांची भागीदारी केली. एकवेळ श्रीलंकेची अवस्था 3 बाद 209 अशी होती. हिंदुस्थानच्या पहिल्या डावातील धावसंख्येपेक्षा ते फक्त चार धावांनी मागे होते आणि सात विकेट हातात होत्या. त्यामुळे श्रीलंका सामन्यात चमत्कार घडवणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

सुथारच्या फिरकीने सामना फिरला

श्रीलंकेच्या या प्रतिकाराला अखेर मानव सुथारने सुरुंग लावला. त्याने धनंजया डी’सिल्व्हाला 23 धावांवर बाद केल्यानंतर पुढच्याच दोन षटकांत सोरियाबंडारालाही तंबूत धाडले. शतकापासून अवघ्या आठ धावांवर त्याची झुंजार खेळी संपली. 173 चेंडूंच्या खेळीत त्याने 10 चौकार आणि एका षटकारासह 92 धावा केल्या. त्यानंतर सारांश जैनने निरोशन डिकवेलाला सहा धावांवर पायचीत केले. त्यामुळे श्रीलंकेची 6 बाद 229 अशी अवस्था झाली. सुथारने दिवसअखेर दोन बळी घेत टीम इंडियाची सामन्यावरील पकड पुन्हा मजबूत केली.

कामिंदूचे अर्धशतकही व्यर्थ

कामिंदू मेंडिसने 55 धावांची संयमी खेळी करत सोरियाबंडाराला चांगली साथ दिली. मात्र त्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजीची घसरण सुरू झाली. कामिल मिशारा 32, लाहिरू उदारा 3 आणि डिकवेला 6 धावांवर बाद झाले. पावसाने पुन्हा हजेरी लावत चौथ्या दिवसाचा खेळ थांबवला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा सोनल दिनुशा 7 आणि केशरा नुवनथा 3 धावांवर नाबाद होते. आता अंतिम दिवशी श्रीलंकेची शेवटची आशा या जोडीवर आहे. हिंदुस्थानकडून मानव सुथारने 2 फलंदाज बाद केले, तर प्रसिध पृष्णा, मोहम्मद सिराज, सारांश जैन व रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.

Comments are closed.