विश्वचषकातून बाहेर पडताच श्रीलंकेत खळबळ! बोर्डाने बोलवली तातडीची बैठक, कर्णधार ते निवड समितीवर

दासुन शनाका श्रीलंका क्रिकेट बातम्या: टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी झाल्यानंतर श्रीलंका क्रिकेटमध्ये मोठ्या बदलांची चाहूल लागली आहे. सह-मेजबान असूनही स्पर्धेच्या सुपर-8 फेरीतून बाहेर पडणे हे संघाला आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला. आता या अपयशाचा थेट परिणाम संघाच्या नेतृत्वावर आणि निवड समितीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सुपर-8 मधून बाहेर पडताच वाढला दबाव

गट फेरीत सलग तीन सामने जिंकत श्रीलंकेने दमदार सुरुवात केली होती. त्यामुळे संघाकडून मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. मात्र सुपर-8 फेरीत प्रवेश करताच कामगिरीत घसरण झाली. पहिल्याच सामन्यात इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला, त्यानंतर न्यूझीलंडनेही श्रीलंकेवर मात केली. या सलग दोन पराभवांमुळे उपांत्य फेरीचे सर्व मार्ग बंद झाले.

2014 मध्ये टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या श्रीलंकेला गेल्या काही वर्षांत मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्याने अपयश येत आहे. घरच्या मैदानावर खेळूनही अपेक्षित कामगिरी न करता आल्याने आता श्रीलंका क्रिकेट बोर्डावर कठोर निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार स्पर्धा संपल्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्ड संघाच्या कामगिरीचा सखोल आढावा घेणार आहे. त्यानंतर कर्णधार दासुन शनाका आणि राष्ट्रीय निवड समितीवर कारवाई होण्याची शक्यता आहे. काही अधिकारी स्वतःहून पदत्याग करू शकतात, अशीही चर्चा रंगली आहे. यापूर्वी मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांनी जानेवारीतच जाहीर केले होते की वर्ल्ड कपनंतर ते पद सोडणार आहेत. त्यामुळे आगामी काळात संघ व्यवस्थापनात मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

पराभवानंतर कर्णधाराची प्रतिक्रिया

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर दासुन शनाका स्पष्टपणे नाराज दिसत होता. घरच्या चाहत्यांसमोर स्पर्धेबाहेर पडणे हा अनुभव खराब असल्याचे त्याने मान्य केले. संघाने सुरुवात चांगली केली, मात्र निर्णायक क्षणी फलंदाज आणि गोलंदाज दोघेही दबावाखाली कोसळल्याचे त्याने सांगितले. टी-20 सारख्या प्रकारात सकारात्मक दृष्टिकोन आणि आक्रमकता आवश्यक असते, पण या स्पर्धेत संघ ती मानसिकता दाखवू शकला नाही, अशी खंतही त्याने व्यक्त केली. काही मोजक्या खेळाडूंवर अवलंबून राहण्याची सवय बदलण्याची गरज असल्याचेही त्याने नमूद केले. आता स्पर्धेनंतर श्रीलंका क्रिकेटमध्ये नेमके कोणते बदल होतात आणि नवीन नेतृत्वासह संघ नव्या उमेदीने उभारी घेतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे ही वाचा –

India vs Zimbabwe T20 World Cup 2026 : ‘संजू सॅमसनमुळेच…’; झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर तिलक वर्मा काय म्हणाला? VIDEO व्हायरल

आणखी वाचा

Comments are closed.